ठाण्यात फेरीवाल्यांचे 'मी पुन्हा येईन'

 वागळे इस्टेट भागातील आयटी पार्क बाहेरील पदपथ अनिधकृत हातगाड्या
वागळे इस्टेट भागातील आयटी पार्क बाहेरील पदपथ अनिधकृत हातगाड्या

ठाणे : ठाणे शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम राबवून शेकडो हातगाड्यांवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र, पालिकेची कारवाई थंडावताच पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे फेरीवाल्यांचे..."मी पुन्हा येईन' हे सुरूच आहे. वागळे इस्टेट प्रभाग समितीमध्येच पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तब्बल पावणेदोनशे हातगाड्यांवर कारवाई केल्याचे पालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, अद्यापही वागळे इस्टेट परिसरात फेरीवाल्यांनी "ठाण' मांडलेले दिसून येत असल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड बनले आहे. 

दीपावली सणानंतर 4 नोव्हेंबरला ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालिका अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन पदपथावरील अतिक्रमणे हटवण्यासह खड्डेमुक्त आणि बॅनरमुक्त ठाणे करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 5 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत शेकडोच्या संख्येने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. एकट्या वागळे इस्टेट प्रभाग समितीमध्ये तीन दिवसात पावणेदोनशे हातगाड्या आणि तितक्‍याच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तरीही आजघडीला वागळे इस्टेटमधील आयटी पार्क भागात शेकडोच्या संख्येने फेरीवाले पदपथ अडवून बसलेले दिसत आहेत. 


आयटी पार्क तीन शिफ्टमध्ये चालत असल्याने येथील फेरीवाल्यांकडे सकाळ-सायंकाळच्या चहा-नाश्‍त्यापासून दुपार व रात्रीचे भोजन आणि आईस्क्रीमची चालती-फिरती वाहनेदेखील रस्ता अडवून उभी असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय तर होतेच किंबहुना संपूर्ण रस्ता अडवून वाहने उभी केल्याने सकाळ-सायंकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. टीएमटीच्या बसेसना याचा सर्वाधिक फटका बसत असून बसेसच्या फेऱ्या कमी होतातच, किंबहुना प्रवाशांनाही नाहक लेटमार्क सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. 

एकट्या वागळे इस्टेटमध्येच नव्हे तर, स्थानक परिसरासह शहरातील इतर भागातही फेरीवाल्यांचे "मी पुन्हा येईन' हे सुरूच असल्याने पालिकेची कारवाई थातुरमातूर असल्याची टीका नागरिक करू लागले आहेत. सॅटीस परिसरातही फेरीवाल्यांकडून अतिक्रमण सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांना येथून मार्ग काढताना मोठे दिव्य पार पाडावे लागते. 

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष 
ठाण्यात फेरीवाल्यांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ता दिला जात असल्याचा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालिका क्षेत्रातील आठवडा बाजार तात्काळ बंद करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले होते. तसेच फेरीवाले, रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील कारवाई तीव्र करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तसेच, कारवाईत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही दिले होते. त्यामुळे आता आयुक्त कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com