ठाण्यात पुन्हा फेरीवाला राज

राजेश मोरे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

ठाणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी नौपाडा परिसर ओलांडून स्थानक गाठावे लागते, पण येथील प्रभाग समितीचे अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाईचा केवळ फार्स करीत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरूनच पायपीट करावी लागत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला पदपथ मोकळे करण्याची मोहीम प्रभाग स्तरावर राबवण्यात आली होती. त्या वेळी नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना काही काळाकरिता उपरती झाली होती. त्यामुळे या परिसरातील फेरीवाल्यांवर काही प्रमाणात कारवाईही झाली, पण पुन्हा ही कारवाई थंडावल्याने फेरीवाल्यांनी आपले बस्तान पुन्हा बसवण्यास सुरुवात केली आहे. 

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी नौपाडा परिसर ओलांडून स्थानक गाठावे लागते, पण येथील प्रभाग समितीचे अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाईचा केवळ फार्स करीत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरूनच पायपीट करावी लागत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला पदपथ मोकळे करण्याची मोहीम प्रभाग स्तरावर राबवण्यात आली होती. त्या वेळी नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना काही काळाकरिता उपरती झाली होती. त्यामुळे या परिसरातील फेरीवाल्यांवर काही प्रमाणात कारवाईही झाली, पण पुन्हा ही कारवाई थंडावल्याने फेरीवाल्यांनी आपले बस्तान पुन्हा बसवण्यास सुरुवात केली आहे. 

नौपाडा परिसरातील भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी या विषयावर आवाज उठवला आहे. त्यांच्याकडून या परिसरात बसत असलेल्या फेरीवाल्यांचे छायाचित्र वारंवार प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. एवढेच नव्हे, तर या फेरीवाल्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलनेही केली आहेत. त्याचबरोबर मनसेने येथील फेरीवाल्यांना एकदा दणका दिल्यानंतर किमान महिनाभर येथे फेरीवाल्यांची फिरकण्याची हिंमत झाली नव्हती, पण आता या फेरीवाल्यांना अधिकाऱ्यांच्या अर्थकारणाचे पाठबळ मिळाल्यानेच कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप संजय वाघुले यांनी केला आहे. 

गोखले रोड अथवा शिवाजी पथ परिसरात बसणारे बहुतांश फेरीवाले हे मुंबईतून ठाण्यात येत असल्याचे कळते. येथील स्थानिक "फेरीवाला दादां'नी त्यासाठी येथील पदपथांची वाटणी केली आहे. त्यातून या फेरीवाल्यांकडून वसुली केली जाते, पण या वसुलीमुळे "स्मार्ट सिटी'च्या दिशेने जात असलेला ठाण्यातील मुख्य रस्ताच फेरीवाल्यांनी व्यापल्याचे चित्र आजच्या घडीला दिसत आहे. 

शहरातील अनेक पदपथ म्हणजे टपऱ्या उभारण्याचे ठिकाण झाले होते. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यावर कारवाई होत नव्हती. पदपथ चालण्यासाठीही शिल्लक राहिले नसल्याच्या तक्रारींचा "ओव्हरडोस' झाल्यानंतर शहरातील सर्व पदपथ तीन दिवसांत मोकळे करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिल्यानंतर पदपथावरील अतिक्रमणावर हातोडा टाकण्यास सुरुवात झाली होती.

विशेष म्हणजे या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याने सर्वच अधिकारी या अतिक्रमणविरोधी मोहिमेत सहभागी झाले होते, पण आता पदपथ मोकळे करण्याची कारवाई पुन्हा थांबल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा रेल्वेस्थानक परिसरात जाणाऱ्या पादचाऱ्यांना बसत आहे. 

अधिकाऱ्यांना सोयरसुतकच नाही... 
ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी सॅटिस प्रकल्प उभारण्यात आला होता. हा प्रकल्प उभारताना ठाण्यातील नागरिकांना अनेक महिने रेल्वे स्थानक गाठताना त्रास सहन करावा लागला. सॅटिस प्रकल्प झाल्यानंतर आणि रिक्षांसाठी मोठा रिक्षा थांबा मिळाल्यानंतर पदपथ मोकळे होतील अशी अपेक्षा होती. आजच्या घडीला किमान पाच लाख पादचारी रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी या रस्त्यांचा वापर करतात. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर पादचाऱ्यांचा मोठा राबता असतो, पण त्याचे कोणतेही सोयरसुतक नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना राहिलेले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feriwalaraj again in Thane