उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, कंगना राणावत विरोधात विक्रोळीत तक्रार दाखल 

जीवन तांबे
Thursday, 10 September 2020

कंगना विरुद्ध मुंबईतल्या विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईः बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.  त्यानंतर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईत आलेल्या कंगनानं घरी पोहोचल्यावर एक व्हिडिओ द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिकेवर टीका केली होती. या व्हिडिओत कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. या विरोधात आता कंगना विरुद्ध मुंबईतल्या विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल आता कंगनाविरोधात तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील युद्ध कमी होण्याऐवजी तीव्र झाले आहे. सध्या वादग्रस्त ठरलेल्या कंगना राणावत हिने उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, तुम्ही माझे घर माफिया मार्फत फोडून मोठे सूड घेतले आहे.  आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अभिमान तुटेल ... उद्धव ठाकरे हे काळाचे चाक आहे, नेहमीच असे नसते.  काश्मिरी पंडितांवर काय घडेल हे आज मला कळले आहे.  आज मी देशाला वचन देतो की मी काश्मीरवर एक चित्रपट तयार करीन आणि माझ्या देशवासियांना जागे करीन,  असा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

या तक्रारीत कंगनाचे काही ट्विटही जोडले आहेत. तसंच तक्रारीत तिच्या एका व्हिडिओचाही उल्लेखही करण्यात आला आहे. अॅड. नितीन माने यांच्यामार्फत विक्रोळी पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कलम ४९९ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे माने यांनी तक्रारीत म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याच नितीन माने यांनी म्हटलं आहे.

--------

(संपादनः पूजा विचारे)

Filed a complaint against Kangana Ranaut at vikhroli police Station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a complaint against Kangana Ranaut at vikhroli police Station