विघ्नहर्त्याच्या मुर्तिकारांवर आर्थिक विघ्न! तयार मोठ्या मूर्तींचे करायचे काय?  लाखो रुपयांचे नुकसान

विघ्नहर्त्याच्या मुर्तिकारांवर आर्थिक विघ्न! तयार मोठ्या मूर्तींचे करायचे काय?  लाखो रुपयांचे नुकसान

तुर्भे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चार फुटी श्री मूर्तींची प्रतिष्ठापणा करावी, अशी सूचना सरकारने दिली आहे. त्यामुळे आधीच तयार केलेल्या मोठ्या मूर्तींचे करायचे काय?, असा पेच मूर्तिकारांसमोर निर्माण झाला आहे. या मूर्तींची विक्री होणार नसल्याने मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे मूर्तिकारांनाही आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्री गणेश मूर्तिकार संघटनेने केली आहे. 

महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. त्यात सार्वजनिक गणेश मंडळांना मोठमोठ्या मूर्ती लागतात. यासाठी मूर्तिकार चार ते पाच महिने आधीच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागतात. मात्र, या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून राज्य सरकारने सर्व सणांसोबत गणेशोत्सवही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने नियमावलीच बनवली आहे. त्यात सर्वांत मोठी अट म्हणजे सार्वजनिक मंडळांनी चार फूट गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या निर्देशामुळे श्री मूर्तिकारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मोठ्या मूर्ती त्यांनी आधीच तयार करून ठेवल्या आहेत. त्यामुळे या मूर्ती जर विकल्या नाही गेल्या, तर आधीच अडचणीत असलेल्या मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पीक नुकसानपोटी आर्थिक मदत दिली जाते, त्याच धर्तीवर मूर्तिकारांनाही आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष चौलकर यांनी केली आहे.

स्थानिक मूर्तिकार नामशेष होण्याच्या वाटेवर
सध्या बाजारात पेण, हमरापूरमधून तयार मूर्ती विक्रीसाठी येत आहेत. यामुळे नवी मुंबईत मागील 50 ते 60 वर्षांपासून आपली कला जोपासणाऱ्या 75 ते 80 स्थानिक मूर्तिकारांवर आज संकट आले आहे. याशिवाय, रंगाचे वाढते दर, जागेचा अभाव, कामगारांची कमतरता अशा अनेक संकटांना तोंड देत नवी मुंबईतील काही स्थानिक मूर्तिकलाकार तग धरून उभे आहेत; मात्र परिस्थिती अशीच राहिली, तर एक दिवस येथील स्थानिक मूर्तिकारांचा व्यवसाय नक्कीच नामशेष होईल, अशी खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.

परप्रांतीय व्यावसायिकांचीही घुसखोरी
बाजारात तयार श्री मूर्ती मिळत असल्याने झटपट नफा कमावण्यासाठी आता परप्रांतीय नागरिकही मूर्ती विक्रीचा   व्यवसाय करू लागले आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नर्सरीमध्ये, तर कधी चक्क हातगाडीवर मूर्ती विकत आहेत. यामुळे पारंपरिक मूर्ती कलाकारांनी नाराजी व्यक्त करत फक्त स्थानिक मूर्तीकारांनाच मूर्तीविक्रीची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी होत आहे.

बाजारात तयार मूर्ती विक्रीसाठी येत असल्याने आणि जागेअभावी शहरातील स्थानिक मूर्तीकार आज अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरात फक्त स्थानिक मूर्तिकारांनाच श्री मूर्ती विक्री करण्याची परवानगी द्यावी. तसेच शहरात मूर्तिकारांना कारखान्यांसाठी कायम किंवा हंगामी जागा उपलब्ध करून द्यावी.
- संतोष चौलकर, अध्यक्ष,
श्री गणेश मूर्तिकार संघटना, नवी मुंबई

--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे  )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com