मुंबईत लेप्टोचा पहिला बळी, मलेरियासह लेप्टोची भीती

भाग्यश्री भुवड
Thursday, 1 October 2020

मुंबईत सप्टेंबर महिन्यात लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच, 27 सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या 661 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गॅस्ट्रोच्या 91 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई: मुंबईत पावसाने जरी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी वातावरणात वाढलेल्या उष्मामुळे मुंबईकरांमध्ये ताप, खोकला, सर्दी आणि डोकेदुखी या आजारांनी भर केली आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला साथीच्या आजारांची लागण होत आहे.

मुंबईत सप्टेंबर महिन्यात लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच, 27 सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या 661 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गॅस्ट्रोच्या 91 रुग्णांची नोंद झाली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे व्हायरल ताप, सुका खोकला, घशात खवखव अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मुंबईत यंदा दोन वेळा रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे, मुंबईत लेप्टोच्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. 27 सप्टेंबरपर्यंत लेप्टोच्या 54 रुग्णांची भर पडली आहे. 

मुंबईतील आजारांची आकडेवारी (27 सप्टेंबरपर्यंत)

रुग्ण    रुग्णसंख्या मृत्यू
     
मलेरिया    661
लेप्टो    54  
स्वाईन फ्लू 01
गॅस्ट्रो   91
हेपेटायटीस 15
डेंग्यू 14 

16 वर्षीय मूलाचा मृत्यू

एफ नॉर्थमधील 16 वर्षीय तरुणाचा लेप्टोने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 31 ऑगस्टपासून त्याला ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा, श्वास घ्यायला त्रास ही सर्वसाधारण लक्षण होती. 02 सप्टेंबरला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 सप्टेंबरला त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या तापाच्या रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

याविषयी अधिक माहिती देताना मुंबई महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं की, 'साचलेल्या पावसाच्या पाण्यातून जास्त वेळ चाललेल्या व्यक्तींनी 72 तासांच्या आत उपचार करुन घ्यावेत. तसंच, खासगी हॉस्पिटलमध्येही तापाच्या रुग्णांना डॉक्सिसायक्लिन सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल त्यांनी आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.'

त्वचेवर कुठे कापले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांचा प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी यांच्याशी संपर्क झाला तर हा भयानक आजार उद्भवू शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्‍तस्त्राव किंवा मेंदूदाह ही या आजाराची लक्षणे आहेत.

काय काळजी घ्याल?

  • आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवा.
  • उंदरांच्या सुळसुळाटाबाबत पेस्ट कंट्रोल ऑफिसरकडे तक्रारी करा.
  • घाणेरड्या पाण्यातून चालताना गम बुटचा वापर करा.
  • अति ताप, डोकेदुखी, डोळे येणे, अशक्तपणा अशी लक्षणं दिसली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • गर्भवती महिला आणि लहान मुलांवरही 72 तासांमध्ये उपचार केले जावेत.
  • लवकर निदान आणि त्यावर तात्काळ उपचारांमुळे आजारांचं प्रमाण रोखता येऊ शकतं.

------------------

(संपादनः पूजा विचारे)

First victim lepto Mumbai fear of lepto with malaria


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First victim lepto Mumbai fear of lepto with malaria