
अवकाळी पाऊस, बदलते हवामान, डिझेलचे वाढते दर, समुद्रातील मासळीचा तुटवडा अशा कारणामुळे रायगड जिल्हयात मासळीचा दुष्काळ जाणवू लागला आहे
अलिबाग - अवकाळी पाऊस, बदलते हवामान, डिझेलचे वाढते दर, समुद्रातील मासळीचा तुटवडा अशा कारणामुळे रायगड जिल्हयात मासळीचा दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे मासळीचे दर दुपट्टीने वाढले असल्याचे मच्छीमार संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. 150 ते 900 रुपये किलोने मिळणाऱ्या मासळीसाठी 300 ते एक हजार 200 रुपये मासळी खवय्यांना मोजावे लागत आहेत.
रायगड जिल्हयामध्ये सुमारे पाच हजार मासेमारीसाठी बोटी आहेत. त्यामध्ये दोन हजार 227 बोटी यांत्रिकी बोटी आहेत. मासेमारी व्यवसायावर सुमारे चार लाख नागरिक अवलंबून आहेत. या व्यवसायातून त्यांना रोजगार प्राप्त होतो. परंतू डिझेलचे दर भरमसाठ वाढल्याने डिझेल, बर्फ तसेच खलाशांचा खर्च न परवडण्यासारखा झाला आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे समुद्रात मासे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना रिकाम्या हातीच परतण्याची वेळ आली आहे. समुद्रात मासळीचा तुटवडा जाणवत असल्याने गेल्या 40 दिवसापासून थळ, नवगाव, वरसोली, चाळमळा, अलिबाग आदी बंदरावर बोटी उभ्या आहेत. त्याचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. मासळीचा ओघ कमी झाला आहे . त्यामुळे मासळीचे दर दुपट्टीने वाढले आहेत. मासळीचे दर वाढल्याने मासळी खवय्यांना लहान मासळी विकत घेऊन दुधाची ताण ताकावर अशी परिस्थिती निर्माण झाले आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
मासळीवर दृष्टीक्षेप
मासळी | मागील दर |
आताचे दर (किलोनुसार) |
बांगडा | 150- 250 | 300 |
सुरमई | 400 | 600 |
लहान आकाराचे पापलेट | 300-400 | 500 |
मोठ्या आकाराचे पापलेट | 900 | 1200 |
लहान आकाराची कोलंबी | 100 | 200 |
मध्यम आकाराची कोळंबी | 200 | 300 |
मोठ्या आकाराची सफेद कोळंबी | 500 | 600 |
समुद्रात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी असणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट मच्छीमारांवर आले आहे. मासळीची कमतरता जाणवत असल्याने मासळीचे दर वाढले असून शासनाने मासळीचा दुष्काळ जाहीर करावा.
शेषनाथ कोळी -
अध्यक्ष
रायगड जिल्हा मच्छीमार संघटना
Fish prices doubled Fish consumer have to pay more in raigad
---------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )