मच्छीमार बोटी रुतल्या गाळात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

सातपाटी बंदरात ने-आण करणेही कठीण; व्यवसाय अडचणीत आल्याने चिंता

पालघर ः पालघर तालुक्‍यातील सातपाटी बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने येथील मच्छीमार अडचणीत आले आहेत. गाळाची ही समस्या वर्षानुवर्षे कायम असून दरवर्षी मच्छीमार श्रमदानातून गाळ काढतात. यंदाही मोठ्या संख्येने गाळ साचल्याने मच्छीमारांना समुद्रात बोटी नेणे कठीण झाले आहे. त्यातच मुसळधार पावसामुळेही बोटी किनाऱ्यावरच आहेत.

गेली अनेक वर्षे पावसाळ्यात सातपाटी बंदरात गाळ साचतो. यामुळे मच्छीमारांना मच्छीमार बोटी ने-आण करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था आणि मच्छीमारांनी याविषयीचे निवेदन पालघरचे जिल्हाधिकारी यांना दिले होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी शिंदे आणि खासदार गावित यांनी गुरुवारी (ता.५) तेथे जाऊन मच्छीमार बंदराची पाहणी केली. मच्छीमार बंदरातील खाडीमधील गाळ काढणे ही मच्छीमारांची पहिली गरज आहे, हे लक्षात घेऊन गाळ काढण्यासाठी खासदार गावित यांनी खासदार निधीमधून तत्काळ २५ लाखांची तरतूद केली आहे.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीतील मार्ग म्हणून अणुऊर्जा प्रकल्पाचा सीएसआर विकास निधीच्या माध्यमातून मुरबे-सातपाटी बंदरांना जोडणारा पूल बांधण्याबाबतही चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पूल बांधण्यासाठी खासदार गावित यांनी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. या वेळी सातपाटी बंधारा, मासळी मार्केट यार्ड, भुयारी विद्युत वितरण, मच्छीमार भगिनींसाठी पालघर येथे मासळी मार्केट आदी विविध विषयांवर चर्चा झाली.

सातपाटी बंदरात नौकानयन मार्गात पावसाळ्यात दरवर्षी गाळ साचतो. त्यामुळे नौका जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बंद होतो. त्यामुळे मच्छीमारांचे नेहमीच नुकसान होते. मच्छीमार सहकारी संस्था नौकाधारक आर्थिक तरतूद करून आणि श्रमदानातून गाळ काढून तात्पुरत्या स्वरूपात नौकानयन मार्ग तयार करतात; मात्र मच्छीमारांची अडचण लक्षात घऊन कायमस्वरूपी नौकानयन मार्ग तयार करावा, यासाठी सरकारच्या मेरिटाईम बोर्डाकडे मागणी केली आहे. 
राजन मेहेर, अध्यक्ष, सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisherman boats sank It is also difficult to navigate the port of Satpati in Palghar