जाळ्यात मासोली गावतचं नाय...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

डहाणूत व्यवसाय डबघाईला ः इंधन, मजुरीत वाढ; मत्स्य उत्पादनात ही घट

डहाणू ः समुद्रातील बदलत्या हवामानामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत असून मच्छीमार समाज सध्या चिंतेत आहे. पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर व्यवसायाला सुगीचे दिवस येतील, अशा अपेक्षेत असलेल्या मच्छीमारांचा भ्रमनिरास झाला असून इंधन, मजुरीच्या दरात झालेली वाढ आणि मत्स्य उत्पादनात सतत होणारी घट यामुळे हा व्यवसाय दोलायमान स्थितीत आला आहे. व्यवसायाची डबघाईकडे वाटचाल सुरू असून सरकारने या व्यवसायाला आर्थिक संरक्षणाबरोबरच विकासासाठी सकारात्मक धोरण आराखडा तयार करावा, अशी मागणी मच्छीमारानी केली आहे.

बेस्ट कामगारांचे आरोग्य धोक्यात

पालघर जिल्ह्यात सातपाटी, मुरबे, अर्नाळा, वसई-पाचूबंदर, कोरे, दातिवरे, झाई, डहाणू आणि धाकटी डहाणू या सर्व गावांत मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. वसई-सातपाटीचा सरंगा व धाकटी डहाणूचा बोंबील या मत्स्यउत्पादनाने मच्छीमारांना बऱ्यापैकी आर्थिक समृद्धी मिळवून दिली; परंतु समुद्रातील हवामान सतत बदलू लागल्याने उत्पादनात प्रचंड घट होत आहे. अशा परिस्थितीत पर्ससीन पद्धतीने करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे माशांची पिल्ले मारली जाऊन त्याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे; परिणामी अशा मासेमारीवर सरकारने त्वरित बंदी आणावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

झाकणं चोर अटकेत, दुर्गंधी मिटली.. 

उत्तन, पाचू बंदर, वसई, सातपाटी, डहाणू, झाई या पट्ट्यातील समुद्र क्षेत्र मच्छीमारीसाठी उपयुक्त आहे. डहाणूच्या किनारपट्टीलगत असलेल्या खडकाळ उथळ समुद्रात शेवंड हा मत्स्यप्रकार मोठ्या प्रमाणावर सापडतो; मात्र हवामानबदलाचा फटका या व्यवसायाला बसल्याने मच्छीमारांची जाळी रिकामीच आहे. पर्ससीन जाळे मत्स्यबीज नष्ट करत आहे; तर रात्रीच्या अंधारात एलईडीच्या प्रकाशातील मासेमारीमुळे या क्षेत्रात स्पर्धा तीव्र होत आहे. यंदा लांबलेला मान्सून परतीचा हंगाम, समुद्रात अकस्मात निर्माण झालेली वादळे, मासेमारीस उपयुक्त असलेल्या सुरुवातीच्या पहिल्या हंगामात झालेल्या पावसाने सुक्‍या मासळीचे नुकसान झाल्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. 

सरकारी योजनांचा लाभ मत्सव्यावसायिकांना व्हावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या धर्तीवर मच्छीमारांनादेखील कर्जमाफी मिळावी; बोट, जहाज बांधणी, मच्छीमार जाळे, साधनसामग्री यासाठी सरकारने सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे.
जयेश पागधरे, मच्छीमार नेते

मच्छीमारांना सोसायटीच्या माध्यमातून वितरित इंधनाचा दर अत्यल्प करावा. मत्स्यव्यवसाय विकसित करण्यासाठी सकारात्मक धोरण आखावे. सुलभ कर्जाची सुविधा निर्माण करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण आणि त्वरित आर्थिक साह्य मिळावे, यासाठी गतिमान योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आहे
तानाजी तांडेल, मच्छीमार

वाढवण बंदरामुळे धोका!
प्रस्तावित वाढवण बंदरामुळे पालघर जिल्ह्यातील संपूर्ण मच्छीमार व्यवसायाला धोका संभवतो. यामुळे जिल्ह्यातील किनाऱ्यावरील ३३ कि.मी. क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या स्थानिकांवर अन्याय होणार आहे. डहाणूची शेवंड, बोंबील, सातपाटी अर्नाळा येथील पापलेट, पालघर झाई भागातील दाढा, सुरमई यांसारख्या महत्त्वाच्या अन्नघटकाला येथील नागरिक कायमचे मुकणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fishery business down in Dahanu