esakal | गणेशोत्सवामुळे फुलांचे दर तेजीत; मोगरा, शेवंती खातेय 'भाव'!
sakal

बोलून बातमी शोधा

Flower-Market

दादर फुलबाजारात मोगऱ्याचा दर 1400 रुपये किलो होता. तो आज 2000 रुपये किलोवर पोहोचला. शेवंती 200 रुपये किलोवरुन 320 रुपये किलो झाली.

गणेशोत्सवामुळे फुलांचे दर तेजीत; मोगरा, शेवंती खातेय 'भाव'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दादर येथील फुलबाजारात मोगऱ्याचे दर 2000 रुपये किलोवर गेले होते, तर शेवंती, गुलछडी 320 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. फुलांची आवक घटल्याने या वर्षी फुलांच्या दरात जास्त वाढ झाली आहे. 

फुलबाजारात शिरायला जागा मिळणे आज मुश्कील झाले होते. एवढी गर्दी बाजार परिसरात होती. त्यात पाऊस झाल्याने लोकांचा जीव मेटाकुटीला आला होता. शुक्रवारी (ता.30) दादर फुलबाजारात मोगऱ्याचा दर 1400 रुपये किलो होता. तो आज 2000 रुपये किलोवर पोहोचला. शेवंती 200 रुपये किलोवरुन 320 रुपये किलो झाली. केळीचे खांब 100 रुपये, केवडाचे एक पान 20 ते 100 रुपये (आकारानुसार), शमी 20 रुपये जुडी, पत्रीची जुडी 20 ते 30 रुपये, आंब्याची डहाळे 10 रुपयांना दोन नग, जास्वंदाची फुले 50 रुपयांना 5 नग, चाफा 80 ते 100 रुपयाला 25 नग, चमेली 480 ते 500 रुपये किलो, गुलाब 120 ते 150 रुपये जुडी, तुळस 20 ते 30 रुपये जुडी, केळीचे पान 10 रुपयाला एक, हाराचे दर 40 ते 150 रुपये (एक), मोगऱ्याचा गजरा 25 ते 30 रुपयाला एक, दुर्वा 20 रुपये जुडी असे फुलांचे दर दादर फुलबाजारात होते. 

गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच तारंबळ उडाली. दादर फुलबाजार, रेल्वे स्टेशन, कबुरतखाना गल्ली येथे चिखल झाल्याने लोकांना चिखलातून वाट काढत फुलबाजार गाठावा लागला. कबुतरखाना गल्लीत मारुतीच्या देवळापर्यंत फूल, सुपारी, नारळ, हार विक्रेते बसले होते. त्यामुळे या गल्लीमध्ये खूप गर्दी झाली होती.

सांगली, कोल्हापूर या भागातून मुंबई मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. पुरामुळे तेथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांच्या आवकेत 50 टक्के घट झाली. या वर्षी बाजारामध्ये माल मागणीपेक्षा कमी येत आहे. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात फुलांचे दर चढेच राहतील. 
- मनोज पुंडे, अध्यक्ष, स्व.माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई, प्रभादेवी

loading image
go to top