गणेश नाईकांचा प्रवेश निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांचा सतत लांबणीवर पडत चाललेल्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त सापडला आहे.

नवी मुंबई - राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांचा सतत लांबणीवर पडत चाललेल्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या बुधवारी वाशीत सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. 

माजी आमदार संदीप नाईक भाजपवासी झाल्यावर त्यांच्यापाठोपाठ गणेश नाईक आणि संजीव नाईक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र यादरम्यान पडलेला खंड आणि नाईकांनी एका खाजगी कार्यक्रमात आपण कोणत्याच पक्षात नसून ‘बॉर्डरवर’ असल्याचा केलेला उल्लेख सर्वांना बुचकळ्यात टाकणारा होता. या काळात प्रवेश कार्यक्रम उरकून टाकण्यासाठी अनेक सोपस्कार नाईकांना पार पाडावे लागल्याचे बोलले जात आहे. वारंवार भाजप प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात येत असल्याने प्रवेशवरून रंगलेल्या मीडिया ट्रायलही भाजप मधील काही नेते मंडळी नाराज झाल्याची चर्चा आहे. नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले आमदार प्रसाद लाड यांच्या घरच्या गणेशाला जाऊन नाईकांनी साकडे घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लाड यांच्याकडून परतल्या नंतर नाईकांचा बुधवारचा प्रवेश निश्‍चित समजला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पनवेलला उपजिल्हा रुग्णालयाच्या उडघटनाला येणार आहेत. तो कार्यक्रम आटपून येताना वाटेत वाशी मध्ये सिडको प्रदर्शन केंद्रात समारंभात नाईकांचा प्रवेश होणार आहे. 

५५ नगरसेवक भाजपमध्ये विलीन
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाठिंबा देणारे अपक्ष अशा एकूण ५५ नगरसेवकांनी भाजप सोबत जाण्यासाठी महापौर निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येकाने वयक्तिक प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी करून नगरसेवक अनंत सुतार यांच्याकडे दिले. मात्र काही तांत्रिक प्रश्न उद्‌भवल्यामुळे सोमवारऐवजी आता ही प्रक्रिया बुधवारी सकाळी संपन्न होणार असल्याचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former NCP minister Ganesh Naik finally been cleared to enter the BJP