किल्ल्यांचे संवर्धन अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

सह्याद्रीतील किल्ल्यांचे मॅपिंग
पावसाळ्यात होणारी झीज थोपविण्यासाठी सह्याद्री पर्वतरांगांतील किल्ल्यांचे मॅपिंग होणार आहे. याबाबत गड-किल्ले संवर्धन समिती राज्य सरकारला प्रस्ताव पाठविणार आहे. पूर्णगड आणि सिंहगड या किल्ल्यांचे मॅपिंग प्राथमिक पातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अधिक अभ्यास केल्यानंतर इतर किल्ल्यांच्या मॅपिंगचे काम सुरू करण्याचा निर्णय निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई - राज्य सरकारने स्थापन केलेल्या गड-किल्ले संवर्धन समितीने हाती घेतलेले २८ किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या किल्ल्यांवरील ५० तोफा संवर्धित करण्यात आल्या आहेत.

ठाण्यानजीक शिरगाव, जामखेडजवळील खर्डा, तसेच गाळणा, तोरणा, माहूर, कंधार, औसा, परांडा, धारूर, आंबागड, माणिकगड या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळली होती व पायऱ्यांची दुरवस्था झाली होती. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने त्यांची डागडुजी करण्यात आली. पुढील टप्प्यात १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ४० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती गड-किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांनी दिली. वेगवेगळ्या किल्ल्यांवरील ५० तोफांच्या संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यांच्यात लोणावळ्याजवळील कोरिगड किल्ल्यावरील तोफांचा समावेश आहे.

तटबंदीजवळ तसेच परिसरात खड्ड्यांत गाडलेल्या तोफा बाहेर काढून संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली. या तोफा गाड्यांवर बसवण्यात आल्या. त्यामुळे त्या आता कायमस्वरूपी संरक्षित झाल्या आहेत, असे बलकवडे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fort Security in Final Step