

Mumbai: ज्येष्ठ मराठी साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरुवारी निधन झाले. ‘सुवार्ता’ मासिकाद्वारे त्यांनी समाजप्रबोधनाबरोबरच मराठीचेही जतन केले. मराठीमध्ये ख्रिस्ती-मराठी साहित्य परंपरेत फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मोठे होते.दिब्रिटो यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता हरपला, अशी श्रद्धांजली मान्यवरांनी वाहिली.
हरित वसईसाठी लढणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे व्यक्तिमत्त्व होते. ‘सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक विषय मांडले
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. समाजात एकता, बंधुता, शांतता, सामाजिक सलोखा राहावा, यासाठी व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधनाचे काम त्यांनी केले.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
फादर फ्रन्सिस दिब्रिटो यांनी साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वसईच्या पर्यावरण रक्षणासाठी तसेच वसईला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस पर्यावरणवादी आणि गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे तसेच सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही, त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी उभी केलेली चळवळ स्मरणात राहील. - शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष
मराठीमध्ये ख्रिस्ती-मराठी साहित्य परंपरा मोठी आहे. त्यात फ्रान्सिस दिब्रिटो हे महत्त्वाचे नाव. नारायण वामन टिळक यांच्याप्रमाणे दिब्रिटो यांनी देखील मराठीपण टिकवले आणि मराठी साहित्याची सेवा केली.
- डॉ. राजा दीक्षित, माजी अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी आणि कौतिकराव ठाले पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पोलिस संरक्षणात त्यांचा पुण्यात साहित्य परिषदेत सत्कार करावा लागला. ते भूमिका घेणारे लढवय्या लेखक होते.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांची निवड किती सार्थ आहे, याचा ऊहापोह करणारा लेख मी लिहिला होता. त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल काही हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतले होते, पण ते आक्षेप कसे चुकीचे आहेत आणि मराठीतून लिहिणाऱ्या या ख्रिस्ती धर्मप्रसारक फादरने मराठी साहित्याची किती सेवा केली आहे, याचे दाखले त्या लेखात दिले होते. त्यांचा संत साहित्याचा अभ्यास खूप चांगला होता. त्यांनी वसईमध्ये पर्यावरण रक्षणासाठी मोठी चळवळ उभी केली होती. त्यामुळे ते खऱ्या ''कार्यकर्ते साहित्यिक'' होते.
- लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.