esakal | चांगला परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली 166 जणांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.

चांगला परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली 166 जणांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. आरोपींनी गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र दोन वर्षे त्यांच्याकडून काहीच न मिळाल्यामुळे अखेर याप्रकरणी तक्रारादारांनी आरोपींविरोधात तक्रार केली होती.

अभिषेक सतीश अगीचा (30) व त्याचा चुलत भाऊ प्रकाश अगीचा यांना आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्याअंतर्गत अटक केली आहे. दोघेही ग्रीन वूड आणि वूड टेक फर्मचे मालक आहेत. 

आरोपी खार पश्‍चिम येथे आठ मजली इमारतीत राहतात. या प्रकरणातील तक्रारदार कमल भाटिया यांचा खार येथे कपड्यांचा व्यवसाय आहे. 2015 मध्ये त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून आरोपींबाबतची माहिती मिळाली होती. सिंधी समाजात प्रसिद्ध असलेले अगीचा बंधू यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असल्यामुळे ते गुंतवणूक स्वीकारत असून महिन्याला अधिक व्याज देत असल्याचे भाटिया यांना समजले. त्यानुसार भाटिया यांनी आरोपींशी संपर्क साधला. सर्व बोलणी झाल्यानंतर त्याने दोन कोटी 30 लाख रुपये 2015 मध्ये गुंतवले.

जून 2017 पर्यंत त्यांना नियमित व्याज मिळाले; पण त्यानंतर पैसे येणे बंद झाले. त्या वेळी भाटिया यांनी पाठपुरावा केला असता त्यांच्याप्रमाणे शेकडो लोकांनी आरोपींकडे रक्कम गुंतवली असून त्यांचेही पैसे अडकल्याचे समजले. गुंतवणूकदारांमध्ये महिला, निवृत्त नागरिकांनीही आरोपींकडे मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी गुंतवलेली रक्कम त्यांच्या इतर व्यवसायांमध्ये वळवली आहे.

पोलिसांत तक्रार
ही सगळी माहिती मिळाल्यानंतर तक्रारदारांनी एकत्र भेटून सर्वांच्या गुतवणूकीची माहिती घेतली व त्यानंतर अगीचा यांना भेटून पैशांची मागणी केली. अगीचा यांनी दिलेल्या मुदतीत रक्कम न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार भादंवि कलम 409, 406, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास वर्ग करण्यात आला. दरम्यान, आरोपींनी गुंतवणूकदारांचे पैसे कुठे गुंतवले आहेत, याबाबत माहिती घेण्याचा काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

loading image
go to top