Mumbai : एक डिसेंबरपासून पनवेल-गोरेगाव लोकल धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local train
एक डिसेंबरपासून पनवेल-गोरेगाव लोकल धावणार

एक डिसेंबरपासून पनवेल-गोरेगाव लोकल धावणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हार्बर रेल्वेच्या पनवेल स्थानकातून गोरेगावला जाणारी लोकल सेवा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांवरील ७ हजार आणि कांदिवली, मालाड येथील ६ हजार प्रवाशांना थेट लाभ होणार आहे.

सध्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी आणि गोरेगाव लोकल सेवा सुरू आहे. याआधी गोरेगावऐवजी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंतच हार्बर रेल्वेचा मार्ग होता. सीएसएमटीहून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून त्यानंतर पश्चिम रेल्वेवरून गोरेगाव व त्यापुढे प्रवास करत होते. गोरेगाव ते पनवेल लोकल सुरू करण्याकरिता जोगेश्वरी, गोरेगाव स्थानकाजवळ लोकल उभी करण्यासाठी (सायडिंग) तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळेच गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल सेवा सुरू होऊ शकत नव्हती.

मात्र, ही तांत्रिक कामे दूर करून लोकल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर महिन्यात हार्बर रेल्वेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. या वेळापत्रकात गोरेगाव ते पनवेल थेट लोकल चालविण्यात येणार आहे. चौकट विस्तारीकरणासाठी २१४ कोटींचा खर्च हार्बर रेल्वे मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण करण्याची योजना २०१० मध्ये आखण्यात आली होती. एमआरव्हीसीद्वारे हे विस्तारीकरण २०१४ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले दिले होते; परंतु त्यानंतर प्रकल्प रखडत गेला.

अंधेरी ते गोरेगाव ५.२ किलोमीटर रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करून २०१८ मध्ये सीएसएमटीवरून पहिली गोरेगाव लोकल धावली. अंधेरी ते गोरेगाव ५.२ किलोमीटरच्या एकूण रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी २१४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पॉईंटर हार्बरचा आढावा - पनवेल ते अंधेरी लोकलच्या ९ अप आणि ९ डाऊन अशा १८ फेऱ्या होतात. - या फेऱ्यांचे १ डिसेंबरपासून विस्तारीकरण करून पनवेल ते गोरेगाव १८ फेऱ्या धावणार - सीएसएमटी ते अंधेरी ४४ फेऱ्या आणि सीएसएमटी ते वांद्रे दोन फेऱ्यांचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण होणार - सध्या सीएसएमटी ते गोरेगाव एकूण ४२ फेऱ्या सध्या धावत आहेत. - डिसेंबरपासून सीएसएमटी/पनवेलवरून गोरेगावसाठी एकूण १०६ फेऱ्या धावतील.

loading image
go to top