राज्याला हवाय पूर्णवेळ अग्निशमन संचालक! भंडारा जळीत घटनेनंतर तरी जाग येण्याची अपेक्षा

मिलिंद तांबे
Tuesday, 12 January 2021

भंडारा रुग्णालयातील जळीत प्रकरणामुळे सुस्तावलेल्या शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत; मात्र अग्निसुरक्षेसाठी ग्रामीण महाराष्ट्रात अग्निशमन यंत्रणा उभारली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे

मुंबई  : भंडारा रुग्णालयातील जळीत प्रकरणामुळे सुस्तावलेल्या शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत; मात्र अग्निसुरक्षेसाठी ग्रामीण महाराष्ट्रात अग्निशमन यंत्रणा उभारली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य अग्निशमन सेवा संचालकाचे पद रिक्त असून, सध्या पालिकेच्या उपायुक्तांकडे या पदाचा अतिरिक्त कारभार आहे. त्यामुळे भंडारा अग्निकांडाचे खापर फोडायलाही जबाबदार अधिकारी राज्य सरकारला गवसलेला नाही. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर तरी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती होणार का, हा प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भंडारा जळीत प्रकरणानंतर राज्यातील ग्रामीण भागातील अग्निशमन यंत्रणेप्रतीची अनास्था समोर आली आहे. ग्रामीण भागात अग्निशमन यंत्रणा केवळ नावाला उरल्याचे चित्र आहे. मुंबईव्यतिरिक्त राज्यात अग्निशमन यंत्रणा उभारणे, त्याचा समन्वय साधणे, आवश्‍यक ते मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देणे या कामासाठी सरकारकडे पाठपुरावा करणे याची जबाबदारी संचालक, अग्निशमन सेवा या अधिकाऱ्यांकडे असते; मात्र 2014 मध्ये तत्कालीन संचालक एम. व्ही. देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेली सहा वर्षे हे महत्त्वाचे पद भरले नाही. गेल्या सहा वर्षांपासून मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखाकडे या पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. मुंबईच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखाकडे आधीच कामाचा मोठा व्याप असतो. त्यामुळे या पदाला न्याय देणे शक्‍य नाही. 

ग्रामीण अग्निशमन यंत्रणा नाही 

2016 ला तत्कालीन मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने जिल्हा पातळीवर सहायक संचालक, अधिकारी, कर्मचारी अशी राज्यभर एकूण 360 पदे भरण्यास मंजुरी दिली होती; मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही. ही यंत्रणा उभारली गेली असती तर रुग्णालये, मॉल, शासकीय इमारतीमधील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेवर लक्ष असते. कदाचित भंडारा रुग्णालयासारख्या आगीची घटना टळली असती किंवा कमीत कमी जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकली असती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

 

वित्त विभागाकडे नव्याने हा प्रस्ताव पाठवला आहे. केवळ पद मंजूर करून काही उपयोग होत नाही. त्याची जबाबदारी, कार्यक्षेत्र निश्‍चित झाले पाहिजे. ते आम्ही केले असून लवकर हा प्रस्ताव मंजूर होईल. 
- महेश पाठक,
प्रधान सचिव, नगरविकास 

 

संचालक का हवेत? 

- राज्याच्या अग्निशमन सेवेच्या बळकटीकरणाची जबाबदारी 
- मुंबईव्यतिरिक्त राज्यात अग्निशमन यंत्रणा उभारणे 
- यंत्रणेत समन्वय साधण्याची जबाबदारी 
- मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे 
- अग्निशमन नियमांची काटेकोर अंमलबजावणी 
- आवश्‍यक ते मनुष्यबळ, निधी उपलब्ध करून देणे 
- महत्त्वाच्या प्रस्तावांचा सरकारकडे पाठपुरावा करणे 
- वेळोवेळी सरकारी यंत्रणेशी समन्वय राखणे 

Full-time fire director need for state Expect to wake up even after the Bhandara burning incident

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Full-time fire director need for state Expect to wake up even after the Bhandara burning incident