बदलापूरचे बाप्पा निघाले मॉरिशसला

गिरीश त्रिवेदी
मंगळवार, 23 जुलै 2019

बदलापूर येथील आंबवणे कुटुंबही गणेश मूर्ती घडवण्यात रंगले असून, त्यांच्या ‘श्री गणेश’ चित्रकला मंदिरातील गणेश मूर्तींना परदेशातही मागणी असते. २४ जुलै रोजी ३०० गणपतींच्या आणि ५ देवीच्या मूर्ती एका कंटेनरमधून समुद्रमार्गे मॉरिशस येथे जाणार आहेत. 

बदलापूर : पावसाळा सुरू होताच वेध लागतात ते लाडक्‍या गणरायाच्या आगमनाचे. सध्या सर्वत्र गणेश कार्यशाळेत मूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. बदलापूर येथील आंबवणे कुटुंबही गणेश मूर्ती घडवण्यात रंगले असून, त्यांच्या ‘श्री गणेश’ चित्रकला मंदिरातील गणेश मूर्तींना परदेशातही मागणी असते. गेल्या १४ वर्षांपासून मॉरिशसमधील काही भाविक त्यांच्याकडून गणेशमूर्ती घेत असून यंदा गणपतींबरोबरच नवरात्रीकरीता देवीच्या मूर्तीही रवाना होत आहेत. पर्यावरण पूरक मूर्तींसाठी आंबवणे बंधूंचा आग्रह असतो. येत्या २४ तारखेला ३०० गणपतींच्या आणि ५ देवीच्या मूर्ती एका कंटेनरमधून समुद्रमार्गे मॉरिशस येथे जाणार आहेत. 
 

गेल्या ७५ वर्षांपासून आंबवणे बंधूंचा ‘श्री गणेश चित्रकला मंदिर’ हा कारखाना आकर्षक व सुबक गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. बदलापुरातील घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी त्यांच्याकडील मूर्तीना मोठी मागणी असते. पाच फुटी पाच मूर्ती मॉरिशसकडे रवाना होणार असल्याचे समीर आंबवणे यांनी सांगितले.

शाडूच्या मूर्ती पाठवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र कंटेनरमध्ये शाडूच्या मूर्ती भंग पावण्याचा धोका अधिक असल्याने शाडूच्या मूर्ती पाठवू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या कलामंदिराचा जो लौकिक वाढला आहे त्यामध्ये येथील कारागिरांचा मोलाचा वाटा असल्याचे उल्हास आंबवणे अभिमानाने सांगतात. 

मूकबधिर असलेल्या निखिल लोखंडे या तरुण कारागिराचा डोळ्यातील रेखीव व कोरीव पणाची जबाबदारी असते तर  पुंडिलक कुंभार या कारागिरांचा शाडूच्या मूर्तीतीत हातखंडा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

मूर्तिकारांची चौथी पिढी  
आंबवणे बंधूंचा गणेश मूर्तीचा हा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या चार पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. ७५ वर्षांपूर्वी परशुराम हरिश्‍चंद्र आंबवणे यांनी या कारखान्याची मूहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नंतर अंनता आंबवणे, मनोहर आंबवणे यांनी या कारखान्याचे काम पाहिले. उल्हास आंबवणे यांनी २५ वर्षे हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळला. सध्या आंबवणे यांची चौथी पिढी म्हणजे उल्हास यांचे पुत्र सागर आंबवणे, पुतणे समीर आंबवणे आदी या व्यवसायाकडे लक्ष देत आहेत. पालिकेच्या माजी सभापती असलेल्या उज्वला आंबवणे याही वेळात वेळ काढून  व्यवसायासाठी आपला वेळ देत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganapati from Badlapur Going to Morishius