भूमिपूजन केलं आणि दुसऱ्याच दिवशी कोसळला कृत्रिम तलाव, लाखो रुपयांचं नुकसान

भूमिपूजन केलं आणि दुसऱ्याच दिवशी कोसळला कृत्रिम तलाव, लाखो रुपयांचं नुकसान

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर गर्दी होऊ नये कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. यासाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी भांडुपमधील १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. मात्र या कृत्रिम तलावचं काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. दरम्यान भांडुपमध्ये लाकडी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्यात आला. तलाव उभारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याची घटना घडली आहे. 

आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते १८ ऑगस्टला भूमिपूजन करण्यात आलं. भांडुपचे सेंटर पॉइंट असलेल्या लालाशेठ कम्पाउंड येथे डांबरी रस्त्यावर, मुंबईत प्रथमच लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्याचा घाट घातला. याचे काही फोटो सोशल मीडियावरही शेअर केले गेले. त्यात गुरुवारी याचे काम पूर्ण झालं. त्यानंतर शुक्रवारी दुपारीच हा कृत्रिम तलाव कोसळल्यानं खळबळ उडाली आहे. 

कृत्रिम तलाव कोसळल्यानंतर परिसरात पाणी पाणी झालं होतं. हे तलाव केंद्रस्थानी असल्यानं ६० टक्के भांडुपकरांना याचा फायदा होणार होता. या तलावाचं कंत्राट शिवेसेनेच्या स्थानिक पदाधिकारीकडून घेण्यात आलं होतं. या तलावासाठी जवळपास ४ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव कोसळल्यानं लाखो रुपये पाण्यात गेलेत. 

या तलावासाठी खोल खड्डा खणणं महत्त्वाचं आहे. डांबरी रस्त्यावर खोदकाम करणं शक्य नव्हतं. त्यात वरच्यावर काम केल्यानं हा तलाव कोसळला. यावर माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

दरम्यान पालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक आयुक्ताची दोन दिवसांपूर्वीच बदली झाली आहे. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यानं अद्याप आपला पदभार स्विकारलेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता एस वॉर्डला कोणी वाली नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थिती प्रशासन काय भूमिका घेईल, असा प्रश्नच भांडुपकरांना पडला आहे.

Ganesh Chaturthi 2020 second day inauguration Bhandup artificial ponds Collapse

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com