समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी गणपती विसर्जन घरातच, त्याचे कारण वाचाच... 

तेजस वाघमारे 
शनिवार, 4 जुलै 2020

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करता विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. भक्तांना घरच्या घरीच गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयोग वरळीतील शिवसैनिक अभिजित पाटील यांनी आखला आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला दाद देत वरळीतील शिवसैनिकाने यंदाचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली साजरा करण्याचा निर्धार केला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे समुद्रात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी लाल मातीपासून मूर्ती तयार करण्याचे ठरवले आहे. या गणेश मूर्तीचे विसर्जन घरातील भांड्यात करण्याची संकल्पना असून मूर्ती विसर्जनापासून निर्माण होणाऱ्या मातीत भक्तांना एक झाड लावता येणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करता विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. भक्तांना घरच्या घरीच गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयोग वरळीतील शिवसैनिक अभिजित पाटील यांनी आखला आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यात असलेल्या मर्यादा पाहून वरळी सागरी कोळी समितीचे पाटील यांनी इकोफ्रेंडली उत्सवाला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे समुद्रात प्रदूषण वाढत आहे. याचा फटका मच्छिमाराना बसत आहे. यासाठी पाटील हे गेल्या काही वर्षांपासून वरळीतील जंबोरी मैदानात पालिकेच्या मदतीने विसर्जन तलाव तयार करत आहेत. या ठिकाणी गेल्या वर्षी ८५० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. प्लास्टर ऑफ पॅरिस वितळविण्यासाठी त्यांनी केमिकलचा वापर सुरू केला. यामुळे काही प्रमाणात समुद्राचे प्रदूषण कमी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

यंदाचा उत्सव साधेपणाने आणि घरच्या घरी साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. लाल मातीपासून चार फुटाची आणि त्याहून लहान मूर्ती ते स्वतः तयार करणार आहेत. या मूर्ती विक्री करण्यात येणार असून मूर्ती सोबत भक्तांना एक रिकामी कुंडी दिली जाणार आहे. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर भक्तांना मूर्ती घरातील बादलीमध्ये विसर्जित करता येईल. मूर्ती विरघळल्यानंतर निर्माण झालेल्या मातीपासून कुंडीमध्ये रोपटे लावता येणार आहे. या उपक्रमामुळे समुद्रातील प्रदूषण कमी होण्याबरोबरच गणेशोत्सव घरच्या घरी सुरक्षितपणे साजरा करता येणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesha devotees will perform Ganpati immersion at home to prevent pollution in the sea