गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'ही' आनंदाची बातमी, नक्की वाचा

पूजा विचारे
Sunday, 9 August 2020

मुंबई पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात राज्याअंतर्गत प्रवासासाठी ई पास आवश्यक आहे. अशातच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना देखील ई पास आवश्यक असल्यानं चाकरमान्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला.  ई-पास शिवाय एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्य नाही. मात्र हीच गोष्ट लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. 

मुंबई पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात खासगी वाहनाने जाणाऱ्यांना ई-पास मिळणे सुलभ व्हावे यासाठी त्याबाबतच्या संकेतस्थळावर विशेष सुविधा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 

यापूर्वी अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत होती. तसंच गणेशोत्सवात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही. पण खासगी वाहनाने जाणाऱ्यांसाठी ई-पास बंधनकारक आहे. आतापर्यंत यात गणेशोत्सवाचा पर्यायाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचाः  पोहता येत नसूनही चिमुकलीला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात घेतली उडी; वाचा २१ वर्षीय तरुणाचा चित्तथरारक अनुभव

गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. मुंबईतील नागरिकांनी https://mumbaipolice.co.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्टपासून एसटी बसेस सोडण्यात आल्यात. त्यांचे प्रचलित तिकीट दरात, आगाऊ आरक्षण ४ ऑगस्ट मध्य रात्रीपासून सुरू करण्यात आले. . एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन एसटी बसेस ५ ऑगस्टपासून १२ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येताहेत. 

अधिक वाचाः  वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यस्तरीय धरणे आंदोलन; विविध संघटना होणार सहभागी

बसेसचे आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. सदर बसेस ह्या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून)शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त कुठेही थांबणार नाहीत.

ganpati festival option easy e pass mumbai police konkan private vehicles


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati festival option easy e pass mumbai police konkan private vehicles