डोंबिवलीकरांचे सुविधांसाठी गाऱ्हाणे

शर्मिला वाळुंज
Wednesday, 11 September 2019

वाहतूक कोंडी, मुजोर रिक्षाचालकांचे वाढते प्रस्थ आणि रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे आदी समस्यांमुळे डोंबिवलीकर पुरता पिचला असून ‘श्रेय कोणीही लाटा, काम कोणीही करा; परंतु आम्हाला प्राथमिक सुविधा द्या, रस्ते द्या’, अशी मागणी डोंबिवलीकर करू लागले आहेत.

ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या घोषणांचा आणि भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. सत्तेतील मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांनाही जाग आली असून कामाचे श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. या सर्व घडामोडी डोंबिवलीकरांसाठी नवीन नाहीत. वाहतूक कोंडी, मुजोर रिक्षाचालकांचे वाढते प्रस्थ आणि रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे आदी समस्यांमुळे डोंबिवलीकर पुरता पिचला असून ‘श्रेय कोणीही लाटा, काम कोणीही करा; परंतु आम्हाला प्राथमिक सुविधा द्या, रस्ते द्या’, अशी मागणी डोंबिवलीकर करू लागले आहेत.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच एमएमआरडीएच्या ४५६ कोटी निधीतून; तर डीपीडीसीच्या १४.८० कोटी रुपये निधीतून डोंबिवली शहरात रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही कामे म्हणजे डोंबिवलीकरांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, राजेश कदम यांनी केला. 

डीपीआर तयार करणे, निविदा काढणे या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात व्हायला किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असताना राज्यमंत्री समस्त डोंबिवलीकरांची फसवणूक करत असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवसेनेचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनीही भाजपवर निशाणा साधत राज्यमंत्र्यांच्या घोषणा आणि भूमिपूजन हा केवळ निवडणुकीच्या तोंडावर घातला जात असलेला घाट आहे. या कामांत पालिकेचेही श्रेय असून सत्ताधारी पक्ष केवळ एकटेच श्रेय लाटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

निवडणुका आल्या की एकमेकांवर टीका केली जाते. परंतु पडद्याआड सर्वच एकत्र असतात, सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे हे राजकारण आता आम्हाला नवीन नाही. मनसेचेही वेगळे काही नाही. एवढी वर्ष विरोधी पक्षांना शहरातील एकही समस्या दिसली नाही का? रस्त्यावरील खड्डे आणि जरासा पाऊस जास्त झाला की घरात शिरणारे पाणी यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. निवडणुका येताच आता सर्व समस्या राजकारण्यांना दिसतील.
- अजिंक्‍य कुऱ्हाडे, डोंबिवलीकर

विकासकामांच्या घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केल्या जातात. नंतर याच कामांचा पाठपुरावा पुढील पाच वर्षे सुरू असल्याचे सांगितले जाते. डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था अनेक महिन्यांपासून आहे. केवळ राजकारणी, कलाकार यांना त्रास झाला की तो मुद्दा उचलला जातो. परंतु सर्वसामान्य नागरिक दररोज मरणयातना सहन करतो, त्याची कोणालाच पर्वा नाही.
- विनय जाधव, डोंबिवलीकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garhane for Dombivlikar facilities