दररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या; BMC आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

भाग्यश्री भुवड
Saturday, 14 November 2020

  • जागतिक मधुमेह दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन
  • "मधुमेह नियंत्रित, रहा सुरक्षित" ही मोहीम आजपासून सुरु 

मुंबई : मधुमेह हा ‘सायलेंट किलर’ असून त्याला आपल्यापासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे नमूद करत महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी मधुमेहास दूर ठेवण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या, असे आवाहन मुंबईकर नागरिकांना आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त केले आहे. त्याचबरोबर ते स्वत: गेली 30 वर्षे दररोज नियमितपणे व्यायाम करत असल्याचे आणि त्यामुळेच मधुमेहाला दूर ठेऊ शकल्याचेही त्यांनी या निमित्ताने आवर्जून सांगितले आहे. तसेच आजच्या जागतिक मधुमेह दिनापासून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने "मधुमेह नियंत्रित, रहा सुरक्षित" ही मोहीम सुरु केली आहे. या मोहीमे अंतर्गत पुढील साधारणपणे एक महिन्याच्या कालावधीत जाणीव जागृती विषयक विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी मधुमेह विषयक जनजागृतीपर माहिती देणारे फलक देखील लावण्यात येत आहेत.

कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

‘इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन’ (आयडीएफ) च्या अंदाजानुसार, भारतात मधुमेहाचे 77 दशलक्ष (7.7 कोटी) रुग्ण आहेत आणि 2045 पर्यंत हे प्रमाण दुप्पट होईल, असाही अंदाज आहे. ‘आयसीएमआर-INDIAB’ च्या सर्वेक्षणानुसार (2017 शहरी लोकसंख्या) मुंबई मध्ये मधुमेहाचे प्रमाण 10.90 टक्के आणि ‘मधुमेह - पूर्व- स्थिती’चे प्रमाण 15 टक्के इतके आहे. हे प्रमाण राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत अधिक आहे. परंतु, 80 टक्के मधुमेह (प्रकार II) आणि हृदय -विकार हे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून रोखता येतात. तसेच उपचार न केल्यास मधुमेहामुळे अंधत्व, अंगच्छेदन, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यासारखे दुष्परिणामही होतात.
..
सध्याच्या ‘कोविड-19’ या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावादरम्यान असे आढळून आले आहे की, मधुमेही रुग्णांमध्ये कोरोनाचा तीव्र संसर्ग होतो. त्याचबरोबर कोरोना मृत्युचे प्रमाणही मधुमेही व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखाने येथे मधुमेह व उच्च रक्तदाब यासाठी तपासणीसह उपचार सुविधा उपलब्ध आहेत. जीवनशैली विषयी जागरूकता वाढविण्यासाठी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त महानगरपालिकेने ‘मधुमेह नियंत्रित, रहा सुरक्षित’ ही मोहीम सुरू केली आहे. ‘आयडीएफ’च्या अनुसार या वर्षाच्या मोहिमेचा आशय ही‘परिचारिका आणि मधुमेह’असा आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची काळजी, प्रतिबंध आणि उपचार यामध्ये परिचारिकेच्या भूमिकेस प्रोत्साहन देण्यात येत आहे.

हेही वाचा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्येही; निर्देशांकांचा सर्वकालिक उच्चांक

जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे नमूद करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 144 दवाखान्यांमध्ये मधुमेहाबाबत समुपदेशकसेवा उपलब्ध आहे. तर, 52 दवाखान्यांमध्ये दृष्टीपटलासाठी तपासणी सेवा असून आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याचीही व्यवस्था महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे.

-------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get enough exercise every day and eat a balanced diet BMC Commissioner appeals to Mumbaikars