"कसाबची साक्ष दिली तेव्हाच हे ठरवलं होतं", कसाबला ओळखणाऱ्या देविकाला व्हायचंय पोलिस

सुनीता महामुणकर
Thursday, 26 November 2020

मी आता कला शाखेत पहिल्या वर्गात आहे. माझं शिक्षण राजस्थानमध्ये होऊ शकतं. पण मला मुंबईतच शिकायचं आहे. - देविका 

मुंबई: "खरंतर आतापर्यंत माझं शिक्षण पूर्ण व्हायला हवं होतं. पण एके 47 च्या गोळ्या लागल्यामुळे काही वर्ष अशीच गेली. मात्र आता मी शिक्षण पूर्ण करणार आणि आयपीएस परीक्षेची तयारी करणार आहे... ", पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला न्यायालयात ओळखणारी बालसाक्षीदार देविका रोटावतचे.

देविका मुंबई हल्ला खटल्यातील सर्वात लहान दहा वर्षाची साक्षीदार. पण तिचे वय आणि तिच्या मनातील धडाडी यांचा काही संबंध नाही. त्यावेळीही तिने न्यायालयात कसाबकडे बोट दाखवून, याने माझ्यावर गोळी झाडली असं ठामपणे सांगितले होते. कुबड्यांंच्या सहाय्याने जेव्हा ती न्यायालयात आली तेव्हा खरंतर सर्वांना प्रश्न पडला होता की ही बोलू शकेल का. पण ती केवळ बोललीच नाही तर कसाबला आव्हान देत, पायाला गोळी लागली तरी उभ राहू शकते, असं दाखवून दिलं. देविकाची ही धडाडी आता बारा वर्षानंतरही कायम आहे. उजव्या पायात गोळ्या घुसल्यामुळे झालेल्या शस्त्रक्रिया, उपचार, घरची हलाखीची परिस्थिती, त्यातच झालेला क्षयरोग, मोठ्या भावाचे आजारपण, त्याच्या शस्त्रक्रिया, आर्थिक चणचण, वडिलांची तुटपुंजी नोकरी अशा सर्व अडथळ्यांवर मात करत ती तशीच ठामपणे उभी आहे.

महत्त्वाची बातमी:  वीज बिल प्रश्नावर मनसेआक्रमक ! आज देणार जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक

वडिलांचा सुकामेवाचा व्यवसाय होता. पण मुंबई हल्यानंतर तो बंद होत गेला. मित्राच्या दुकानात ते काम करतात. माझ्या शिक्षणात खंड पडला. क्षयरोग झाल्यामुळे तब्येत ढासळली. मी आता पदवीधर व्हायला हवी होती. वांद्रे सरकारी वसाहतीमध्ये भाड्याने राहतो आम्ही. घरखर्च कसाबसा चालवतो. पण माझ्या आणि भावाच्या उपचारासाठी पैसे हवे होते. मागच्या सरकारने दहा लाख रुपये मदतही केली. पण घराची चिंता आहेच, असे देविकाने सांगितले.

मी आता कला शाखेत पहिल्या वर्गात आहे. माझं शिक्षण राजस्थानमध्ये होऊ शकतं. पण मला मुंबईतच शिकायचं आहे. भारतीय पोलिस दलात काम करायचं आहे. कसाबची साक्ष दिली तेव्हाच हे ठरवलं होतं. घर चालविण्यासाठी एखादी नोकरीही करावी लागेल. पण आता मी स्वतःला यासाठी तयार करते आहे. दहशतवादची भीती अजूनही आहे. लोकांनी माझे खूप सत्कार केले. कौतुक केलं. मदतही केली. पण माझ्या समस्या मला आता सोडवायच्या आहेत. त्यासाठी शिक्षण हवं, अशी कबुलीही तिने दिली.

महत्त्वाची बातमी: मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयाला यूएसए JCI द्वारे सलग दुसऱ्यांदा मान्यता

मुंबई हल्ल्याच्या दिवशी देविका तिचे वडील नटवरलाल आणि भाऊ जयेश बरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला होती. त्यांना पुण्याला जायचं होतं. मात्र कसाब आणि अतिरेकी ईस्माईल यांनी एके 47 मधून गोळीबार सुरु केला. वडिलांनी दोन्ही मुलांना घेऊन टर्मिनसमधून बाहेर पडायचा प्रयत्न केला. पण देविकावर कसाबने गोळ्या डागल्या आणि तिचा पाय निकामी केला. त्यामुळे शाळेतील तीची वर्षेही वाया गेली. पण तिचा निश्चय आणि ध्येय आता स्पष्ट आहे. आता ती चेतना महाविद्यालयात शिकते. ज्या दहशतवादाला ती बळी पडली तिचा सामना आता तीला पोलिस  होऊन करायचा आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तीला साथ दिली तर एक वेगळा आदर्श निर्माण होऊ शकेल.

(संपादन- सुमित बागुल)

girl who confirmed identity of kasab wants to join police forces devika rotavat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl who confirmed identity of kasab wants to join police forces devika rotavat update