कोव्हिड काळातील खर्चाचा तपशील देण्यास अधिकाऱ्यांची तारांबळ; हिशोबावर विरोधकांचाही आक्षेप

समीर सुर्वे
Thursday, 21 January 2021

कोव्हिड काळात महानगरपालिकेने खर्च केलेल्या 1600 कोटी रुपयांचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत; मात्र बुधवारी अपेक्षित माहिती न आल्याने त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

मुंबई  : कोव्हिड काळात महानगरपालिकेने खर्च केलेल्या 1600 कोटी रुपयांचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत; मात्र बुधवारी अपेक्षित माहिती न आल्याने त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. स्थायी समितीची प्रतिष्ठा राखा, असा इशाराच आज अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिला. 

मालाड पी दक्षिण प्रभागात कोव्हिड काळात केलेल्या खर्चाचा हिशोब बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. त्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला. आजवर सादर झालेल्या प्रत्येक प्रस्तावात मोघम माहिती दिली जात आहे. कोरोना काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांची चंगळ झाली आहे. वारंवार मागणी करूनही विस्तृत माहिती सादर केली जात नाही. त्यामुळे संशयाला वाव आहे, असेही त्यांनी नमूद केले; तर आजवर 125 प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर तसाच अपूर्ण माहितीचा प्रस्ताव सादर केला जात आहे. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवावा. प्रशासनाने विस्तृत माहितीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी उपसूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मांडली. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला आहे. याशिवाय प्रशासनाला गंभीर इशाराही दिला आहे. स्थायी समितीची प्रतिष्ठा आहे. ती राखा, चार महिने झाले तरी तपशीलवार माहिती दिली जात नाही. स्थायी समितीच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा जाधव यांनी दिला.

give details of expenses incurred during the Covid period Opponents also objected to the account

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give details of expenses incurred during the Covid period Opponents also objected to the account