esakal | Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्या; क्रांती मोर्चाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्या; क्रांती मोर्चाची मागणी

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश करून तेथून त्यांना आरक्षण द्यावे, असा ठराव आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संमत झाला. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे तत्काळ करण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. 

Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्या; क्रांती मोर्चाची मागणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई ः सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश करून तेथून त्यांना आरक्षण द्यावे, असा ठराव आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संमत झाला. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे तत्काळ करण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. 
मराठा क्रांती मोर्चातर्फे आज आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा आयोजित केली होती. या वेळी राज्यातील सर्व प्रमुख समन्वयक उपस्थित होते. 25 तारखेनंतर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीअंती मराठा आरक्षण टिकले नाही तर संभाजीनगर येथे मेळावा घेऊन नंतर राज्यात सर्वत्र मेळावे घेऊन आंदोलन केले जाईल, असाही इशारा बैठकीत देण्यात आला. 

मराठा आरक्षण हे 50 टक्के मर्यादेच्या पुढील असले तरी कायदेशीर अपवाद सिद्ध करून एसईबीसी आरक्षण टिकवण्याचे पूर्ण प्रयत्न सरकारने करावेत. अन्यथा ओबीसी गटाचे कॅटेगरायझेशन करून गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठ्यांना ओबीसी वर्गात समाविष्ट करून तेथून मराठ्यांना आरक्षण द्यावे, असाही ठराव संमत करण्यात आला. औरंगाबादचे तत्काळ नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करावे, असाही ठराव संमत झाल्याची माहिती समन्वयक विरेन पवार यांनी दिली. 
ओबीसी गटाचे कॅटेगरायझेशन करून त्यातून मराठ्यांना आरक्षण दिले तर कदाचित मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी होईल; मात्र त्याची काळजी सरकारने घ्यावी व त्यासाठी हवे तर ओबीसी आरक्षणाचीच टक्केवारी वाढवावी, असेही पवार यांनी सांगितले. 

समाजाची दिशाभूल थांबवा! 
मराठा उमेदवारांना कोणत्या गटातून आरक्षण द्यावे हे अनिश्‍चित असल्याने त्यातील अडचणी सोडविल्याशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू नये. यापूर्वी एसईबीसी गटात समाविष्ट केलेल्या दोन हजार 185 मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी. समांतर आरक्षणाच्या प्रशासकीय चुकीने अन्याय झालेल्या मराठा समाजातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ईडब्ल्यूएस गटातील आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाची चाललेली दिशाभूल थांबवावी, अशाही मागण्या या वेळी करण्यात आल्या. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शिवजयंती साजरी करणार 
मराठा क्रांती मोर्चातर्फे 19 फेब्रुवारीला राज्यभर शिवजयंती दिमाखात साजरी केली जाईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनीही मराठा आरक्षणप्रश्‍नी राजकारण करू नये, तर मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन या वेळी करण्यात आले/

Give reservation to Maratha community in OBC category Demand by kranti  morcha

-------------------------------------------

  ( संपादन - तुषार सोनवणे )

loading image