कंत्राटी पद्धतीने सत्तेवर आलेले सरकार, कंत्राटी पद्धतीनेच काम करणार: भाजप

कृष्णा जोशी
Tuesday, 6 October 2020

राज्याचा कारभार खासगी संस्था आणि ठेकेदारांच्या हाती देण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे, अशी जळजळीत टीका करतानाच, कंत्राटी पद्धतीचा वापर करून सत्तेवर आलेले सरकार कंत्राटी पद्धतीनेच काम करणार, असा टोलाही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.  

मुंबई:  राज्यात रिक्त असलेली हजारो सरकारी पदे कायमस्वरुपी तत्वावर नोकरभरती करून भरण्याची प्रक्रिया मागील सरकारने सुरु केली होती. मात्र या सरकारने ती पदे कंत्राटी तत्वावर भरुन दुटप्पी वर्तन केले आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

राज्याचा कारभार खासगी संस्था आणि ठेकेदारांच्या हाती देण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे, अशी जळजळीत टीका करतानाच, कंत्राटी पद्धतीचा वापर करून सत्तेवर आलेले सरकार कंत्राटी पद्धतीनेच काम करणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

राज्यात रिक्त असलेल्या वेगवेगळ्या खात्यांमधील ७२ हजार जागांकरिता मागील सरकारने भरती प्रक्रिया सुरु केली होती. त्यातून राज्यातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी शासकीय नोकरी मिळणार होती. मात्र ती भरती प्रक्रिया पूर्ण न करता आता ठाकरे सरकारने कंत्राटी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही राज्यातील लाखो युवकांची फसवणूक असल्याचं भातखळकर म्हणाले. 

मुंबईतल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकीकडे महाराष्ट्रातील युवकांना शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवायचे आणि दुसरीकडे सर्व तृतीय आणि चतुर्थ वर्गातील पदे खाजगी संस्था आणि ठेकेदारांकडून भरती करण्याचा निर्णय घ्यायचा, हा ठाकरे सरकारचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

अधिक वाचाः  मुंबई महापालिका सज्ज, भविष्यातील संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थापणार अत्याधुनिक लॅब

 कोरोनाच्या काळातही दिवस रात्र काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आशा सेविकांना राज्य सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत पगार द्यायचे नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना तीन-तीन महिने पगार द्यायचे नाहीत. मात्र दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्याचे नूतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायचे. राज्य सरकारकडे पैसे नसताना सुद्धा मंत्र्यांच्या खाजगी वापराकरिता २५ लाखांच्या आलिशान गाड्या विकत घ्यायच्या. कोणतेही काम न करता केवळ जाहिरातबाजी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करायचा, यातून राज्यसरकारची मानसिकता लक्षात येत आहे. खाजगी संस्था आणि ठेकेदारांच्या हाती राज्याचा कारभार देण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Government came power on contract basis will work on contract basis only BJP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government came power on contract basis will work on contract basis only BJP