सरकारी कर्मचाऱ्यांचे "हम नही सुधरेंगे' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

कामाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी केली. त्यानुसार सोमवारपासून कामाला सुरुवात झाली. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, प्रांत कार्यालय अशा अनेक सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी पनवेल, रसायनी, पेण, रोहा तालुक्‍यातील आहेत. त्यामुळे बस आणि खासगी वाहनांनी येतात. त्यामुळे त्यांना कार्यालयात वेळेवर पोहचता आले नाही. 

अलिबाग : सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करतानाच राज्य सरकारने कार्यालयातील कामाच्या वेळाही वाढवल्या आहेत. त्याचा आज पहिला दिवस होता; परंतु उशिराने कार्यालयात दाखल होण्याची अनेकांची "सवय' या दिवशीही कायम होती. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी अनेकांची तारांबळ उडाली. त्यामुळे या कार्यालयात आलेल्या नागरिकांनी "हम नही सुधरेंगे' अशी त्यांना कोपरखळी लगावली. 

राज्य सरकारी कार्यालयात रविवारी सुट्टी असते; परंतु या कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी पाच दिवसांच्या आठवड्यासाठी अनेक वर्षांपासून आग्रह धरला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या या मागणीला मूर्त रूप दिले; परंतु कामाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी केली. त्यानुसार सोमवारपासून कामाला सुरुवात झाली. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, प्रांत कार्यालय अशा अनेक सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी पनवेल, रसायनी, पेण, रोहा तालुक्‍यातील आहेत. त्यामुळे बस आणि खासगी वाहनांनी येतात. त्यामुळे त्यांना कार्यालयात वेळेवर पोहचता आले नाही. 

हे वाचा : एजाज लकडावालाच्या साथीदाराला अटक़ 

अलिबाग परिसरात राहणारेही काही कर्मचारी "लेट लतिफ' होते. या सगळ्यांची वेळेत पोहचण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली. त्यांची ही धावपळ पाहून कामाच्या निमित्ताने सरकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांना चांगलेच हसू फुटले. त्यांनी "हम नही सुधरेंगे' अशा त्यांना कोपरखळ्या लगावल्या. 

काही धास्तावले 
जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी दीडशेहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. पाच दिवसांचा आठवडा सुरू केल्याने कामाच्या वेळेतही बदल झाला आहे. त्यामुळे या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर यावे लागले. काही कर्मचारी उशिरा पोहचल्याने त्यांच्यामध्ये भीती होती. अधिकारी कारवाई करतील की काय, अशा प्रकारचे वातावरण होते. 

राज्य सरकारच्या "पाच दिवसांचा आठवडा' या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयात सकाळी पावणेदहा वाजता हजर राहणे आवश्‍यक आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना अटी लागू करण्यात आल्या आहेत. तीन दिवस उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तशी अट लागू करण्यात आली आहे. 
- दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government employees will not improve