सरकारचे खासगी रुग्णालयांसाठीचे नवे दरपत्रक अन्यायकारक! आयएमएचा विरोध; केवळ काॅर्पोरेट रुग्णालयांचे हित 

मिलिंद तांबे
Wednesday, 2 September 2020

राज्य सरकारने खासगी रूग्णालयांसाठी जाहीर केलेल्या नव्या दर पत्रकाला इंडियन मेडीकल असोसिएशन, महाराष्ट्रने विरोध केला आहे

मुंबई : राज्य सरकारने खासगी रूग्णालयांसाठी जाहीर केलेल्या नव्या दर पत्रकाला इंडियन मेडीकल असोसिएशन, महाराष्ट्रने विरोध केला आहे. नवे द पत्रक आयएमएला विचारात न घेता जाहीर करण्यात आले. त्यामुळे छोट्या रूग्णालयांवर  अन्याय होणार असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक; वाचा सविस्तर बातमी

सार्वजिनक आरोग्य विभागामार्फत राज्य सरकारने अधिसूचना जारी करत खासगी रूग्णालयांच्या दर पत्रकाला मुदतवाढ दिली आहे. यापुर्वी 80 टक्के खाटांवर सरकारचे नियंत्रण होते. नव्या दरपत्रकामध्ये नॉन कोव्हिडच्या खाटांमध्ये सरकारने 50 टक्के सुट दिली आहे. हा निर्णय केवळ मुंबई क्षेत्रातील मोठ्या कॉर्पोरेट रूग्णालयांना फायदेशीर ठरेल, असे आयएमएचे म्हण्णे आहे. नव्या दरपत्रकामुळे एकाच वेळी नॉन कोव्हिड आणि कोव्हिड असे दोन्ही रूग्ण मोठ्या कॉर्पोरेट रूग्णालयांत उपचार घेऊ शकतात. मात्र, लहान आणि मध्यम स्वरूपाच्या रूग्णालयांमध्ये असे वेगळे विलगीकरण शक्य नाही. त्यामुळे 50 टक्के खाटांपर्यंतची दिलेली शिथिलता ही केवळ कॉर्पोरेट रूग्णालयांच्या सोईसाठी करण्यात आल्याचा आरोप आयएमएने केला आहे. 

येत्या दोन दिवसात अंतिम परीक्षाबाबत निर्णय येणार, उदय सामंत यांची माहिती

सरकारच्या अधिसुचनेत ऑक्सिजन, पीपीई कीट या बाबींवर रूग्णालयांचा मोठा खर्च होत असल्याचे म्हटले आहे.  या सर्व गोष्टींवर चर्चा कऱण्यासाठी आयएमएने सरकारला वारंवार विनंती केली. मात्र, सरकारने कुठलीही चर्चा न करता नवी अधिसूचना काढून एकतर्फी दरपत्रक जाहीर केले, अशी नाराजी आयएमएने व्यक्त केली. नव्या दरपत्रकाचे पालन करणे छोट्या खासगी रूग्णालयांना अशक्य असून या दरांप्रमाणे काम केल्यास खासगी रूग्णालये टिकू शकणार नाहीत, अशी भिती ही आयएमएने व्यक्त केली आहे. 

थोडी लक्षणं दिसली तरी लगेच उपचार करा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

पीपीई किट, मास्कचे दर अनियंत्रित
रूग्णांना अवाजवी भुर्दंड बसू नये यासाठी सरकारने पीपीई कीट ,मास्क यांच्या दरांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सरकार कितीही दावे करत असले तरी आज केवळ कागदोपत्री हे दर नियंत्रित असल्याचा, आरोप आयएमएने केला आहे. बाजारात पीपीई कीट आणि मास्कच्या किंमती अनियंत्रित आहेत. त्याऐवजी रूग्णालयांवर बंधन टाकली जात आहेत. मात्र, यासह आॅक्सिजनला लागणारा खर्च छोटी रूग्णालये आणणार कुठून? असा प्रश्नही आयएमएने उपस्थित केला आहे.

 

राज्य सरकारने येत्या दोन दिवसांत चर्चा कऱण्यासाठी तातडीची बैठक घ्यावी. आम्ही जनतेसाठी उभे आहोत. हे एकतर्फी निर्णय आम्हाला मान्य नाहीत. अशा प्रकारच्या एकतर्फी, अव्यवहार्य नियमांनूसार रूग्णालयांवर सक्ती केल्यास सर्व ड़ॉक्टरांना सोबत घेऊन पुढे काय पावले उचलायची, यावर आयएमए गांभिर्याने विचार करेल.
- डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governments tariff for new private hospitals is unjust! Opposition to the IMA; Only the interests of corporate hospitals