UnmaskHappiness | "सकाळ'च्या विशेष उपक्रमाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

ऋषीराज तायडे
Friday, 8 January 2021

"सकाळ'च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित "अनमास्किंग हॅपीनेस' या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे आज राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते राजभवनात अनावरण करण्यात आले. 

मुंबई  : "सकाळ' हे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. कोरोनानंतरच्या आजारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी "सकाळ'ने सुरू केलेला "अनमास्किंग हॅपीनेस' हा उपक्रम कोरोनामुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद परत आणेल. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणारी ही मोहीम कौतुकास्पद आहे, असे उद्‌गार राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी काढले. "सकाळ'च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित "अनमास्किंग हॅपीनेस' या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे आज राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते राजभवनात अनावरण करण्यात आले. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांंसाठी क्लिक करा

"सकाळ'च्या वतीने वर्धापनदिनानिमित्त दर वर्षी जानेवारी महिन्यापासून जनगागृती केली जाते. गेल्या पाच वर्षांमध्ये "सकाळ'ने अनेक समाजोपयोगी विषयांना हात घातला आहे. "प्लास्टिकमुक्त मुंबई', "अवयवदान', "हृदयविकार', "कर्करोगा'सारख्या विषयांवर सखोल अभ्यास करून वर्षभर जनजागृती केली. या वर्षी कोरोनाच्या रुग्णांमध्ये उपचारानंतर उद्भवणाऱ्या विविध शारीरिक तसेच मानसिक व्याधींबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम "सकाळ'ने हाती घेतला आहे. त्यासाठी एका अभ्यासगटाच्या माध्यमातून कोरोनानंतरच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासोबतच कोरोना काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता, प्रसंगी जीव धोक्‍यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मानही केला जाणार आहे. 

काय आहे "अनमास्किंग हॅपीनेस' उपक्रम? 

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून मास्क, सॅनिटायझर, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग असे अनेक नवे शब्द प्रचलित झाले. अगदी आपल्या प्रियजनांपासून ते देशातील महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत अनेकांना आपण या महामारीत गमावले. त्यातही टाळेबंदीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. एकूणच गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वांच्याच मनावर एक प्रकारचे दडपण आले आहे; पण संकट आले म्हणून आपले जगणे किंवा आयुष्यातला आनंद हिरावला जाऊ शकत नाही. या संकटाला सामोरे जाताना तुमच्या-आमच्या आयुष्यातील सहज-सोपा आनंद, हास्य परत आणण्यासाठी ही एक छोटीशी धडपड... 

ईसकाळवरील ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

असे व्हा सहभागी 

कोरोना काळातील नकारात्मक भावना किंवा आठवणी मागे सारत आयुष्यातील आनंद नव्याने परत आणण्यासाठी तुम्हीही "सकाळ'च्या "अनमास्किंग हॅपीनेस' या उपक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी 
तुम्ही तुमचा हसतानाचा सेल्फी #UnmaskHappiness या हॅशटॅगसह शेअर करा. सोबतच फेसबुकवर @UnmaskingHappiness आणि ट्‌विटरवर @UnmaskHappiness ला टॅग करायला विसरू नका.

Governor bhagatsinh koshari unveils logo of Sakal special initiative UnmaskHappiness

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor bhagatsinh koshari unveils logo of Sakal special initiative UnmaskHappiness