सरकारचे 'मुँह मे राम दिल मे नथूराम': संजय दत्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नथूराम गोडसे स्मारक हे कल्याणजवळ 5 किलोमीटर अंतरावर 'सापड' गावात उभारले जात आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला कलंक असून 'मुँह मे राम दिल मे नथूराम' असणाऱ्या या सरकारची भूमिका दूटप्पी असल्याची टिका काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार संजय दत्त यांनी केली.

मुंबई - कल्याणमध्ये हिंदू महासभेने जागा घेतली असून, त्या जागेवर नथूराम गोडसे स्मारक बांधण्याचा घाट घातला जात आहे.  त्यासाठी राजस्थानमधून पुतळा आणला जाणार आहे, अशी माहीती काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार संजय दत्त यांनी सभागृहात दिली. 

विधानपरिषदेत संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सांगितले, की नथूराम गोडसे स्मारक हे कल्याणजवळ 5 किलोमीटर अंतरावर 'सापड' गावात उभारले जात आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला कलंक असून 'मुँह मे राम दिल मे नथूराम' असणाऱ्या या सरकारची भूमिका दूटप्पी असल्याची टिकाही त्यांनी केली.  

राज्यात कोणाचा पुतळा उभा करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी लागते, अशी परवानगी दिली जाणे शक्यच नाही. या प्रकाराशी सरकारचा काहीही संबंध नसून संपूर्ण प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी यावर कडाडून टीका केली. खासगी जागेवर पुतळा उभारला जाणार असून त्याठिकाणी सशस्त्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा सर्व प्रकार थांबवणे हे सरकारचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: govt supports Nathuram Godse statue says INC MLA