दिव्यात बोगस पूरग्रस्तांनी लाटले धान्य?

आरती मुळीक-परब
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दिव्यात यंदा निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाणे पालिका प्रशासनाकडून धान्य वाटप केले जात आहे; मात्र या धान्याचा पूरग्रस्त कमी व बाकीचे लोक अधिक लाभ उठवत आहेत. हा धक्कादायक प्रकार दक्ष नागरिकांनी उघडकीस आणला. या प्रकारावर सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कथित गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दिवा : दिव्यात यंदा निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाणे पालिका प्रशासनाकडून धान्य वाटप केले जात आहे; मात्र या धान्याचा पूरग्रस्त कमी व बाकीचे लोक अधिक लाभ उठवत आहेत. हा धक्कादायक प्रकार दक्ष नागरिकांनी उघडकीस आणला. या प्रकारावर सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कथित गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
   
दिव्याचा बराचसा भाग पाण्याखाली गेला व प्रचंड नुकसान झाले. विविध स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू केला आहे. तसेच पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यालयात धान्य वाटप केले जात आहे. मात्र या धान्य वाटपातही गैरव्यवहार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या वतीने केवळ तीन हजार कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. त्यातही अनेकजण बोगस पूरग्रस्त असल्याचा आरोप होत आहे. या बोगस पूरग्रस्तांमुळे उर्वरित २४ हजार पूरग्रस्त नागरिकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

दिव्यातील पूरग्रस्तांना पालिकेतर्फे धान्य वाटप केले जात आहे. पण तेथे सकाळपासून बरीच गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी होत होती. तसेच पूरग्रस्त नसलेले कोणीही धान्य घेऊन जात आहेत. हे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांची कार्यपद्धती बदलली पाहिजे. 
- जनार्दन पेडणेकर, नागरिक, दिवा

दिवा प्रभाग समितीमध्ये पहिल्यांदा पूरग्रस्तांना वाटायला ३ हजार पाकिटे आलेली आहेत. त्यामुळे ज्यांची टॅक्‍स पावती आहे त्यांना प्रधान्याने धान्य देत आहोत. आम्ही शहानिशा करूनच धान्य वाटप करीतो आहोत. 
- रंजन वाघचौरे, पालिका अधिकारी, दिवा प्रभाग समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grain flooded by bogus floodlights?