Raigad : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पुढील महिन्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पुढील महिन्यात

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी राजीनामा दिला, तर काही सदस्यांचे निधन झाले. अशा अनेक कारणांमुळे रिक्त सदस्य पदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १८२ ग्रामपंचायतीमधील २८५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमधील १२, मुरूड आठ ग्रामपंचायतीमधील २१, पेण तालुक्यातील २१ सदस्यपदांसाठी, पनवेल नऊ, उरण सात, कर्जत १४, खालापूर चार, रोहा १३, सुधागड चार, माणगाव १६, तळा २०, महाड ६७, पोलादपूर २४, श्रीवर्धन ३३, म्हसळा १९ अशा एकूण १५ तालुक्यांतील १८२ ग्रामपंचायतीमधील २८५ रिक्त सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती व सरकारने वेळोवेळी घातलेले निर्बंधांमुळे रिक्त पदांच्या निवडणुका घेता आल्या नाहीत. कोरोना जिल्ह्यामध्ये नियंत्रणाखाली आहे. सर्व आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. कोरोनाच्या आटोक्यात आलेल्या परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, त्यावर हरकत व सूचना दाखल करणे, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे अशा पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम १८ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील या रिक्त पदांच्या सदस्य पदांची पोट निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

loading image
go to top