मदतीपासून वंचित ठेवणार नाही; ठाण्याच्या पालकमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

शरद भसाळे/प्रकाश परांजपे/मुरलीधर दळवी
Thursday, 22 October 2020

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी भागातील नुकसानग्रस्त भातशेतीचा आढावा पालकमंत्री शिंदे यांनी गुरुवारी घेतला. 

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 

अधिक वाचा : भाजीपाल्यानंतर कडधान्य डाळींचे दर झाले दुपट्ट, ताटात वाढायचे तरी काय? गृहीणीपुढचा प्रश्न

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी भागातील नुकसानग्रस्त भातशेतीचा आढावा पालकमंत्री शिंदे यांनी गुरुवारी घेतला. यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. शिंदे यांनी सुरुवातीला भिवंडी तालुक्‍यातील कांदळी गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे मागील वर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर वाचला.

भिवंडी तालुक्‍यात सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. मात्र परतीच्या पावसाने सुमारे 8 हजारहून अधिक हेक्‍टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे.

शहापूर तालुक्‍यात १४ हजार १५५ हेक्‍टर क्षेत्रापैकी १२ हजार ३३५ हेक्‍टर म्हणजे ८० टक्‍क्‍यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना याआधीच सूचना दिलेल्या असून कृषी व महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा : ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

यावेळी पाहणी दौऱ्यावेळी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार शांताराम मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, तहसीलदार अादिक पाटील. गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, मुरबाडचे बांधकाम सभापती कुंदन पाटील, देवगाव गटाच्या सदस्या प्राजक्ता भावार्थे, मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख कांतीलाल कंटे आदी उपस्थित होते.

मुरबाडमधील वनपट्टेधारकांना दिलासा
मुरबाड तालुक्यात खासगी मालकीच्या शेतजमिनींबरोबरच, वनपट्टेधारक यांच्या शेतजमिनीवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांनाही सरकार भरपाई देणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तालुक्‍यातील शिद गाव येथे भात पिकाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. जिल्ह्यात सुमारे ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्‍वासन शिंदे यांनी दिले.
---------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Eknath Shinde inspects Loss of rice cultivation in Thane district