छठपूजेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर; उत्सव साधेपणाने साजरा करा, गृहमंत्र्यांचे आवाहन

विनोद राऊत
Thursday, 19 November 2020

कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उतर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने सरकारकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्यात.

मुंबई: कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उतर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने सरकारकडून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्यात. या नियमांचे पालन करावे असं  देशमुख यांनी म्हटलंय. 

खालीलप्रमाणे छठपूजेसंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना

  • कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरिकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी.  घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी.
  • महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
  • छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतिषबाजी आणि ध्वनीक्षेपणास बंदी असेल.
  • उत्तर भारतीय नागरिकांनी छठपूजेदरम्यान मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.
  • छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची  व्यवस्था करण्यात यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  • कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Guidelines Chhath Puja released Celebrate festival with simplicity  Home Minister appeal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidelines Chhath Puja released Celebrate festival with simplicity Home Minister appeal