गुरुपौर्णिमा विशेष : अखेरच्या श्वासापर्यंत नृत्यसाधना!

Manjiri Dev
Manjiri Dev

मुंबई - कथ्थक नृत्यात तब्बल ४२ वर्षे योगदान देऊन सहा हजारांहून अधिक विद्यार्थी घडवले. नृत्यसाधनेने मला भरभरून दिले. माझे विद्यार्थी भारतासह सातासमुद्रापार ही नृत्यकला पुढे नेत आहेत, याचा अभिमान आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत नृत्यसाधना सुरूच ठेवणार आहे, असा ध्यास ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ. मंजिरी देव यांनी व्यक्त केला. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी नृत्याचा प्रवास उलगडला. 

मंजिरी मूळच्या कोल्हापूरच्या. आईने वयाच्या नवव्या वर्षी त्यांना पंडित बंद्रिनाथ कुलकर्णी यांच्याकडे कथ्थक शिकण्यासाठी पाठवले. तेव्हापासून मंजिरी यांचे घुंगरांशी नाते जोडले. कथ्थकचे धडे सुरू होते; पण त्यासंदर्भातील परीक्षा त्यांनी दिली नव्हती. शिक्षण संपताच श्रीराम देव यांच्याशी विवाह झाल्यानंतर मंजिरी ठाण्याच्या रहिवासी झाल्या. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन यात त्यांचे कथ्थकप्रेम मागे पडले. आठ वर्षे त्या रियाज करू शकल्या नाहीत; मात्र नंतर त्यांची पावले पुन्हा कथ्थकच्या दिशेने थिरकली.

त्याच्या परीक्षेसाठी ठाणे-कोल्हापूर प्रवास होत राहिला. कोल्हापुरातील त्यांच्या गुरूंच्या माध्यमातूनच त्यांना मुंबईत आशा जोगळेकर गुरू म्हणून लाभल्या आणि कथ्थकचा नवा अध्याय सुरू झाला. ‘कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ध्येयाकडे वळता येते आणि ते साध्यही करता येते, हा आत्मविश्‍वास मला आशाताईंनी दिला’, असे मंजिरी सांगतात. मंजिरी यांचे पुत्र प्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव यांचे ब्रिजबास मिश्रा यांच्याकडे तबल्याचे शिक्षण सुरू झाले. त्या वेळी मंजिरी यांची पंडित गोपीकृष्णन यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडूनही त्यांनी कथ्थकचे धडे घेत बनारस घराण्याचा वारसा पुढे नेला.

गुरूंमुळे प्रवास सुकर!
फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आल्यानंतर खूप स्ट्रगल करावा लागला. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. या क्षेत्रात आपला निभाव लागेल का, ही भीती होतीच; पण मेहनतीच्या जोरावर संधी मिळत गेली आणि गुरूंनी दिलेले धडे या खडतर प्रवासात फायदेशीर ठरले. सुरवातीच्या काळात या क्षेत्रात पुरुष फॅशन डिझायनर फार कमी होते; मात्र तरीही स्पर्धा होतीच. चांगले मार्गदर्शक मिळाल्याने यशाचे शिखर पार करत गेलो. स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी खूप घाम गाळावा लागला. हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण केलंच पाहिजे, ही शिकवण माझ्या गुरूंनी दिली.
- रियाज गांगजी, फॅशन डिझायनर

खंबीर गुरू लाभणे भाग्याचे
कुटुंबाला चार पिढ्या शास्त्रीय संगीताचा वारसा लाभला आहे. पणजोबा संगीतमहर्षी बाबा बोरगावकर यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली होती. वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून मी गायला लागलो. ‘सारेगमप’मध्ये योगायोगाने एन्ट्री झाली होती. तिथे खूप काही शिकता आल्याने ते व्यासपीठ माझ्यासाठी गुरूसमान आहे. माझी ‘दिवाना झालो’ या अल्बममधील गाणी रसिकांच्या पसंतीस पडली अनेक मोठ्या कलाकारांकडून प्रेरणा मिळते. खंबीर गुरू लाभणेही भाग्याचे असते.
- मंगेश बोरगावकर, गायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com