'हाफकीन'मध्ये अधिकाऱ्यांना पीएच.डी.पासून रोखले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - विविध प्रकारच्या लसींचे संशोधन करण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी या संस्थेने आपल्याकडील अधिकाऱ्यांना पीएच.डी. अथवा एम.एस्सी. पीएच.डी. करायचे नाही, असे एक तुघलकी फर्मान काढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई - विविध प्रकारच्या लसींचे संशोधन करण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी या संस्थेने आपल्याकडील अधिकाऱ्यांना पीएच.डी. अथवा एम.एस्सी. पीएच.डी. करायचे नाही, असे एक तुघलकी फर्मान काढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील हाफकीन संस्थेत कायम संशोधन आणि त्यासाठीचे काम चालू असून, त्यासाठी आपल्याला त्यात अधिक चांगले योगदान देता यावे, यासाठी येथील काही अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पीएच.डी. करण्यासाठी परवानगी मागितली असून, त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे. यासाठी संस्थेने या अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संस्थेत कार्यरत असताना पूर्णवेळ कार्यालयीन काम करणे अपेक्षित आहे, यामुळे संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संस्थेत कार्यरत असताना त्यांना संस्थेतून एम.एस्सी. व पीएच.डी. करण्यासाठी परवानगी नाकारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, पीएच.डी. आणि एम.एस्सी. करण्यास परवानगी नाकरण्याचा निर्णय संस्थेच्या नियामक परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचेही म्हटले आहे.

हाफकीन संस्थेत मागील काही महिन्यांमध्ये चारहून अधिक अधिकाऱ्यांनी संस्थेकडे पीएच.डी. करण्याची परवानगी मागितली होती, त्यांना सपशेल परवानगी नाकारण्यात आली आहे.

संस्थेत पीएच.डी. करण्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोखण्यात येत असल्याने संस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा अधिकारीवर्गाने केला आहे.

एम.एस्सी. पीएच.डी. हा विषय पूर्णवेळ असल्याने तो करताना संस्थेच्या कामांवर परिणाम होतो. संस्थेतही अनेक संशोधनाची कामे ही कायम सुरू असतात; परंतु एखादा अधिकारी, कर्मचारी पूर्णवेळ पीएच.डी. करण्यासाठी गेल्यास त्यांच्या कामाचा बोजा इतरांवर येत असल्याने त्यासाठी आमच्या नियामक परिषदेच्या बैठकीत मागील वर्षीच सर्वानुमते येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एम.एस्सी. आणि पीएच.डी. करण्यास नाकारण्यात आले आहे.
- डॉ. निशिगंधा नाईक, संचालिका, हाफकीन संस्था, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hafkin training research center mumbai officer P.Hd. education