Dombivali News : फेरीवाला मुक्त प्रभागात हातगाड्यांचे अतिक्रमण; शिव वडापावचा शिरकाव

डोंबिवली शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न जटील असतानाच आता फेरीवाल्यांनी नविन शक्कल लढविण्यास दिवाळीपासून सुरुवात केली आहे.
Shiv Vadapav
Shiv VadapavSakal

डोंबिवली - शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न जटील असतानाच आता फेरीवाल्यांनी नविन शक्कल लढविण्यास दिवाळीपासून सुरुवात केली आहे. शहरात कोठेही स्टॉल, हातगाडी लावा त्यावर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय नेत्यांचे फोटो झळकवण्यास फेरीवाल्यांनी सुरुवात केली आहे. दिवाळीतील फटाक्यांच्या स्टॉल नंतर आता पश्चिमेतील स्टेशन परिसरात फेरिवाले अतिक्रमण करु लागले आहेत.

हा प्रभाग फेरिवाला मुक्त असताना तेथे शिववडा पावची गाडी लागली असून त्यावर मुख्यमंत्री व खासदार शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र याला आता नागरिकांनीच विरोध केला असून या बेकायदा टपऱ्या हटविण्याविषयी तक्रार पालिकेकडे केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर हा मागील आठ वर्षापासून फेरिवाला मुक्त प्रभाग आहे. मात्र या रस्त्यावर आता फेरिवाल्यांचे अतिक्रमण वाढू लागले आहे. रसवंती गृह, शिववडा पावची गाडीने या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण केले आहे. ना फेरीवाला क्षेत्रातील अनधिकृत टपरी आणि स्टॉलवर कारवाईची मागणी येथील नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.

या गाड्यांवर कारवाई होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींकडून या गाड्यांवर कारवाई होऊ नये म्हणून दबाव टाकण्यात येत आहे. दिवाळीत देखील अशाच पद्धतीने राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो स्टॉलवर लावत व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता आपला व्यवसाय केला.

आत्ताही नागरिकांनी तक्रारी करुन देखील पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शहरातील प्रसिद्ध नाख्ये उद्योग समूहाच्या मालमत्ते समोर फेरीवाल्यांनी बेकायदा बस्तान मांडले आहे. या फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नाख्ये उद्योग समुहाचे संचालक व मारूती मंदिर सेवा ट्रस्टच्या अध्यक्षांनी पालिका आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिला आहे.

या गाड्यांवर आत्ताच कारवाई केली गेली नाही तर अनेक वर्ष फेरीवाला मुक्त असलेला हा परिसर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शिव वडापावचा शिरकाव

काही वर्षापूर्वी मराठी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून शिवसेनेने शिववडा नावे वडापाव विक्री करण्यासाठी हातगाडी दिल्या होत्या. शहरात विविध ठिकाणी अनेक तरुणांनी हा व्यवसाय सुरु केला. आता मात्र सेनेत दोन गट पडल्यानंतर ही मोहीम थंडावली आहे. मात्र काही विक्रेते याचा फायदा घेत शिववडा असे लिहून आपल्या टपऱ्या उभ्या करत आहेत. डोंंबिवली पूर्वेतील फत्ते अली रोडवर अशीच टपरी उभारण्यात आली.

प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी त्यावर कारवाई करत ती हटविली. काही दिवसांपूर्वीच पनवेल बस थांब्याजवळ अशी गाडी सुरु झाली होती. तसेच डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावर व्दारका हाॅटेल जवळील स्कायवाॅक खाली, रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या आत गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे यांची प्रतीमा असलेली शिववडा पावची हातगाडी आणून ठेवण्यात आली आहे.

अशाच पध्दतीने जोंधळे हायस्कूल समोरील वळण रस्त्यावर पदपथ अडवून एक रसवंती दुकान सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही हातगाड्या वर्दळीच्या रस्त्यावर, पादचाऱ्यांच्या, वाहनांच्या येण्या जाण्याचा मार्गात आहेत.

भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी या टपऱ्या हटविल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. धात्रक यांनी यासंदर्भात आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. प्रत्येक जण रेल्वे स्थानक भागात टपऱ्या लावण्यास सुरूवात करील. पश्चिम परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकेल. या दोन्ही टपऱ्या तातडीने उचलण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केली आहे.

याविषयी केडीएमसीच्या ह प्रभाग सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com