शहापूर-किन्हवलीतील काळू नदीवरील पूल धोकादायक 

शामकांत पतंगराव
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

५५ वर्षे आयुर्मान असलेल्या या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाचे कठडे तुटले आहेत. अगदी काही कठड्यांच्या लोखंडी सळ्या दिसत असून, कठड्यांमध्ये झाडांची मुळेही घट्ट रोवली आहेत. 

ठाणे : किन्हवली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला आणि शहापूर-मुरबाड या दोन तालुक्‍यांना जोडणारा महत्त्वाचा असा काळू नदीवरील संगम पूल धोकादायक स्थितीत आहे. ५५ वर्षे आयुर्मान असलेल्या या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाचे कठडे तुटले आहेत. अगदी काही कठड्यांच्या लोखंडी सळ्या दिसत असून, कठड्यांमध्ये झाडांची मुळेही घट्ट रोवली आहेत. 

सध्याच्या मुसळधार पावसात काळू नदी दुथडी भरून वाहन असल्याने पुलाची वेळीच देखभाल दुरुस्ती न केल्यास महाड येथील ‘सावित्री’ची नदीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री एम. एस. कन्नमवार यांच्या हस्ते १० जून १९६३ मध्ये काळू नदीवरील संगम पुलाचे उद्‌घाटन झाले होते. तत्पूर्वी ७ एप्रिल १९६० मध्ये पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली. पुलाचे काम ३१ मे १९६३ मध्ये पूर्ण झाले. नदीपात्रापासून ४५ मीटर उंची व ५५२ मीटर लांबी असलेला शहापूर तालुक्‍यातील हा एकमेव पूल आहे. पुलाला ६० मीटरच्या ८ कमानी असून रस्त्याची रुंदी २२ फूट आहे. ५५ वर्षापूर्वी जोडरस्त्यासह केवळ ५ लाख ५० हजार  रुपये इतका खर्च या पुलासाठी झाला होता. 

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहापूर उपविभागाने कित्येक वर्षांपासून डागडुजी व देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने हा पूल शेवटच्या घटका मोजतोय. या पुलाचे कठडे कमकुवत झाले असून त्यावर पिंपळ व अन्य वनस्पतींची झाडे रूजली आहेत. सिमेंटचा प्लास्टर गळून पडल्याने लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना धडकी भरते. 
याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या शहापूर कार्यालयातील उपअभियंता अरुण जाधव व कनिष्ठ अभियंता पी. डोंगरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही.

...तर पुलाचे आयुर्मान वाढेल
पूर्वी काळू नदीवर या ठिकाणी छोटासा पूल होता. तो चार महिने महापुरात पाण्याखाली असायचा. कित्येक दिवस वाहतूक बंद असायची. पर्याय म्हणून नदी पलिकडे जाण्यासाठी बांबूचा तराफा वापरला जायचा. या पुलाच्या कामासाठी मजुरी केलेले काही जण अजून हयात आहेत. संगम पुलाची डागडुजी करून नूतनीकरण केल्यास त्याचे आयुष्य वाढेल. 

  ‘दिवसाकाठी चार ते पाच आणे मजुरी करून या पुलावर काम केले आहे. भर उन्हात काम करताना अनेक जखमा झाल्या होत्या. त्याचे व्रण अजूनही शरीरावर आहेत. काही मृत झाले आहेत. या पुलाशी जीवाभावाचे नाते आहे.
- शंकर रामा बांगर, (वय ७८) मजूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hazardous bridges over the river Kalu in Shahpur-Kinhwali