रायगडातील केशकर्तनालयांचे रूपडे बदलले 

रायगडातील केशकर्तनालयांचे रूपडे बदलले 

पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच वर्षांत 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक व्यावसायिकांनी हे बदल स्वीकारले असून लाखोंच्या कमाईमुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होत आहे. 

मोबाईल, इंटरनेटमुळे गाव-खेड्यातील तरुण पिढीच नव्हे; तर शाळकरी मुलेही बदलत आहेत. त्याचाच परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर दिसत आहे. आता हा बदल केस, दाढीसारख्या एकेकाळी क्षुल्लक बाब वाटणाऱ्या बाबींमध्येही दिसून येत आहे. त्यामुळे केशकर्तन व्यवसायही कात टाकत आहे. 

रायगड जिल्ह्यात नजीकच्या काही वर्षांपर्यंत केशकर्तनही बलुतेदारीनुसार होत असे. आता ते मागे पडले आहे. 
केशकर्तन व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना बसण्यासाठीच्या खुर्च्यांपासून अन्य साधनसामग्री बदलली आहे. काही व्यावसायिकांनी जस्ट डायल, गुगल, सोशल मीडियावर "सलून'ची माहिती दिली आहे. सेवांची माहिती त्यावर अधोरेखित केली आहे. त्यामुळे आगाऊ वेळ घेऊन ग्राहक येत आहेत. ग्राहक चांगल्या सेवेसाठी आणि नवनवीन "स्टाईल'साठी पैसा खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या व्यवसायात मिळणाऱ्या पैशामुळे सर्व समाजातील तरुण व्यवसायाकडे आकृष्ट झाले आहेत. 

सुधागड तालुक्‍यातील कल्पेश पांडव हा तरुण बी.एस्सी. करून मुंबई येथे सलून व्यवसायातील आधुनिक प्रशिक्षण घेऊन आला आहे. अलिबाग तालुक्‍यातील अमित वैद्य आणि विकास पाटील यांच्यासह अनेक तरुणांनी तर सलून व पार्लर क्षेत्रात विविध अद्ययावत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील इतरही तरुणांना ते अशा प्रकारचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. अमित हे तर "ऍडव्हान्स कोर्स'साठी परदेशातसुद्धा जातात. 

रोहा येथील मिरॅकल सलूनचे मालक पराग मोरे यांनी "सकाळ'ला सांगितले की, 2006 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी पारंपरिक स्वरूपाततच हा व्यवसाय करत होतो. आता त्यात बदल केले असून नवीन आधुनिक यंत्राचा उपयोग करत आहे. दुकानाची अंतर्गत यंत्रणा बदलली आहे. 

13 वर्षांपूर्वी पारंपरिक "सलून'मधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा आता तब्बल 60 ते 70 टक्के अधिक उत्पन्न मिळत आहे, असेही त्याने सांगितले. 

केशकर्तन व्यवसायात विविध समाजातील तरुण पसंती देत आहेत. केस-दाढी असा हा मर्यादित व्यवसाय राहिला नाही. त्याला तंत्रज्ञानाची जोडदेखील मिळाली आहे. मेहनतीने चांगली व दर्जेदार सेवा देऊन चांगला पैसा कमावता येतो. 
- सुदाम शिंदे, सचिव, रायगड जिल्हा नाभिक संघटना 
 
केशकर्तन व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे या व्यवसायात खूप संधी आहेत. काही दिवसात नवीन अद्ययावत सलून सुरू करणार आहे. 
- मंगेश रावकर, अध्यक्ष, रोहा-अष्टमी नाभिक समाज 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com