सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करा : विखे पाटील

संजय शिंदे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुंबई : महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

सोमवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल, असे ते म्हणाले. 

दोन दिवसांपूर्वी हमीद दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मूळ सूत्रधाराचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. आज पुण्यात निघालेल्या मोर्चातून देखील हीच मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत?

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत? महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रे व बॉम्बसाठा सापडतो, तरूणांना फितवून शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचे दिसून येते, संशयीत मारेकऱ्यांकडे डायरीत पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची 'हिटलिस्ट' सापडते. देशविघातक कारवायांचे एवढे पुरावे हाती लागल्यानंतरही सरकार गप्पच आहे. यांची कार्यपद्धती 'अल कायदा'सारखी आहे. त्यांचे गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे निराळे, त्यांना शस्त्रे देणारे निराळे, हत्येची योजना आखणारे निराळे, आणि कोणाची हत्या करायची, हे ठरविणारेही निराळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते व त्यापलिकडे त्याला इतर काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही.

'ब्रेन वॉश' करणारे 'महागुरू' कोण?

महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्याकांडातील आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. बहुजन समाजाची तरूण मुले आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील नाही. कपड्याच्या दुकानात काम करणारा सचिन अंदुरे आणि 'लेथ मशीन'वर काम करणाऱ्या शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. तरीही त्यांच्याकडे पिस्तूल येते आणि ते थंड डोक्याने डॉ. दाभोलकरांची हत्या करतात; यासाठी केवळ 'ब्रेन वॉश'कारणीभूत असून, हा 'ब्रेन वॉश' करणारे'महागुरू' कोण? ते शोधण्याची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले.

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार

गौरी लंकेश हत्येमध्ये सनातनसारख्या संघटनेची नेमकी कशी भूमिका होती, हे जाणून घेण्यासाठी आपण लवकरच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्नाटक एटीएसकडे पुरेसे पुरावे असतील तर त्यांनी गौरी लंकेश हत्येसाठी थेट सनातनविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्याआधारे सनातनवर बंदी घालण्यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचा मानस असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Head of Sanatan Sansthan Jayant Athavale arrested: Vikhe Patil