आरोग्य खात्यानं 270 कोटी लुटले, प्रविण दरेकर यांचा आरोप

कृष्णा जोशी
Saturday, 12 September 2020

कोरोनाच्या काळात खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

मुंबई: कोरोनाच्या काळात खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. अत्यंत स्वस्त दरात कोरोना चाचण्या करण्याची सरकारी कंपन्यांची तयारी होती, पण सरकारने ती दुर्लक्षून जास्त दर आकारणाऱ्या खासगी कंपन्यांना मोकळे रान दिले, असाही आरोप त्यांनी केला. 

या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्य शासनाने स्वॅब चाचणीचे दर आता थोडे कमी केले. मात्र हिंदुस्तान लेटेक्स लि. (एच.एल.एल. लाइफकेअर) या भारत सरकारच्या कंपनीने राज्य शासनाला 19 ऑगस्ट रोजीच ही चाचणी 796 रुपयांत करण्याचा प्रस्ताव दिला होता.  मात्र शासनाने हा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला. तो मान्य केला असता तर जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले असते, असेही दरेकर म्हणाले. 

ऑगस्ट महिन्यात खासगी लॅबधारकांना शासनाने स्वॅब चाचणीसाठी 1900 ते 2200 रुपये दर मंजूर केला होता. म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान खासगी लॅब धारकांनी प्रत्येक चाचणीमागे साडेबाराशे रुपये जास्त आकारले. आतापर्यंत राज्यात 50 लाख चाचण्या झाल्या असून त्यापैकी 19 लाख 34 हजार चाचण्या खासगी लॅबमधून झाल्या. त्याद्वारे त्यांनी 242 कोटी 92 लाख रुपयांची लूट केली, असा आरोपही दरेकर यांनी केला. 

ॲण्टीबॉडी टेस्टमध्येही लूट

जुलै महिन्यात खासगी लॅबधारक अँटीबॉडी टेस्ट साठी एक हजार रुपये दर आकारीत होते. तेव्हा एच.एल.एल. लाईफकेअर कंपनीने या दरापेक्षा कमी म्हणजे 291 रुपयांत अँटीबॉडी टेस्ट करण्याची तयारी दर्शविली होती. तरीही राज्य सरकारने खाजगी लॅब धारकांना त्यासाठी 599 रुपये घेण्याची परवानगी दिली. म्हणजेच प्रत्येक ॲण्टीबॉडी टेस्टमध्येही 300 रुपये लूट सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या पाहता जनतेची 27 कोटी रुपयांची लूट झाली आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.

-------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Health department looted Rs 270 crore Allegation Pravin Darekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health department looted Rs 270 crore Allegation Pravin Darekar