दिलासादायक! मुंबईतील लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ;  पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

दिलासादायक! मुंबईतील लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ;  पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईसह राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचावी आणि त्यांचं लसीकरण व्हावं यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. यातच आता पालिकेने नागरिकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली असून १०० पेक्षा जास्त केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र, आता किमान ५ ते ६ लसीकरण केंद्रात १४ तास लसीकरण करण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार,  सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ वाढवण्यात येणार आहे. 

लसीकरण केंद्रावरील वेळ वाढवण्यासोबतच या केंद्रावर नागरिक देत असलेला प्रतिसाद पाहून इतर केंद्रांमध्ये ही सुविधा वाढवू असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश  काकाणी यांनी सांगितलं.  घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयासह आणखी पाच ते सहा रुग्णालयात येत्या मंगळवारपासून १४ तास लसीकरण केले जाणार आहे. तर, टप्प्याटप्पाने अनेक लसीकरण केंद्रांना १४ तास लसीकरणाचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. 

"सुरुवातीच्या टप्प्यात राजावाडी रुग्णालयासह आणखी पाच रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी डबल शिफ्टमध्ये काम करणार आहेत.  त्यामुळे आता नागरिकांना सकाळी ७ ते रात्री ९ या दरम्यान लस घेता येणार आहे. या सुविधेमुळे आणखी चांगला आकडा गाठण्यास मदत होईल", असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

दररोज १ लाख लस टोचण्याचे लक्ष्य ठेवत पालिकेने १०० हून अधिक लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. असे असूनही, आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स  आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगट या तिन्ही गटातील लाभार्थ्यांची संख्या अजूनही वाढलेली नाही. ८ मार्च रोजी ६५ केंद्रांवर ४० हजार, ५०२ लोकांना लस देण्यात आली होती. मात्र, गेल्या सहा दिवसांच्या आकडेवारीनुसार, १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांचे सरासरी लसीकरण हे जवळपास ४१ हजारांपर्यंत झाले आहे. 
१८ मार्च रोजी ९१ केंद्रांवर ३९ हजार, ६४४ लोकांचे लसीकरण झाले. १९ मार्च रोजी ९२ केंद्रांवर ही संख्या ४२ हजार,७४०  वर पोचली आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी ९४ केंद्रांवर ही संख्या ४९ हजार ५४७ एवढ्या लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

दरम्यान, मंगळवारपासून राजावाडी रुग्णालयात १४ तास लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम केले जाईल. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून सकाळी  ७ ते रात्री ९ पर्यंत लसीकरण सुरू होईल. लोक सकाळी जरी आले तरी रजिस्ट्रेशनसाठी थांबावे लागते. त्यांचा वेळ आता वाचेल,असं राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक  डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com