पालिकेसमोरील उड्डाणपुलाखाली डेब्रिजचे ढीग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नवी मुंबईत स्वच्छता अभियान राबवले जात असतानाही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुख्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली मात्र स्वच्छता अभियानाचा अभाव दिसून येत आहे. उड्डाणपुलाखाली बांधकामाच्या मातीचे ढिगारे साचले असून, खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव टाकला जात आहे.

नवी मुंबई : शहरात स्वच्छता अभियान राबवले जात असतानाही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुख्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली मात्र स्वच्छता अभियानाचा अभाव दिसून येत आहे. उड्डाणपुलाखाली बांधकामाच्या मातीचे ढिगारे साचले असून, खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

स्वच्छतेमध्ये शहराला देशात अव्वल सिद्ध करण्यासाठी पालिकेकडून सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. रहिवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून त्यांना कचरा वर्गीकरणाचेही महत्त्व पटवून दिले जात आहे; मात्र बेलापूर येथील आयकर कॉलनी तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या उड्डाणपुलाखाली मनपा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या उड्डाणपुलाखालील भूखंडावर खुलेआम डेब्रिज (राडारोडा) टाकण्याचे काम भरदिवसा डेब्रिज माफिया करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेब्रिजचे ढीग साचले आहेत. शहरात अनेक ठिकाणी खाडीकिनारी भागात डेब्रिज टाकले जात आहेत. 

उरणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली तर गेल्या काही दिवसांपासून डेब्रिज माफियांनी गाड्या रिकाम्या करण्याचा सपाटा लावला आहे. उड्डाणपुलाखाली असणाऱ्या या मोकळ्या भूखंडावर गेल्या एक महिन्यापासून डेब्रिजचे डोंगर उभे राहत आहेत. हा भूखंड खाडीलगत असल्यामुळे खारफुटी नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच नियमबाह्य डेब्रिज टाकत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. बेलापूर, नेरूळ, सीवूड्‌स परिसरात सध्या अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे येथील बांधकाम व्यावसायिकांना माती, डेब्रिजची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तरीदेखील खर्च वाचवण्यासाठी डेब्रिज माफियांनी उड्डाणपुलाखाली असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यास सुरुवात केली आहे.

मनपाच्या डेब्रिज पथकांकडून कठोर अशी कारवाई होत नसल्यामुळे डेब्रिज माफियांचे फावले आहे. त्यामुळे डेब्रिज पथकाने वेळीच कारवाई करावी.
- वीरेंद्र म्हात्रे, सचिव, नवी मुंबई काँग्रेस कमिटी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heaps of debris Under the flyover In front of Navi Mumbai Municipal Corporation