
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केल्यानंतर या सर्व प्रकरणात आता राजकीय नाट्य रंगलं आहे.(Navneet Rana Latest News)
राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ कलमानुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी आज पार पडली. मात्र, सुनाणीला सुरुवात झाल्यानंतर व्यस्त कामामुळे पुढील सुनावनी उद्या होणार असल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं. त्यामुळे राणा दाम्पत्याचा आणखी एक दिवस तुरुंगात मुक्काम वाढला आहे.
दोन्ही आरोपी हे सराईत नाहीत. ते दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. ते कुठेही पळून जाणारे नाहीत. त्यांनी कोणताही गंभीर गुन्हा केलेला नाही, असा युक्तिवाद आबाद फोंडा यांनी केला. सरकारी वकिल आज त्यांचं प्रत्युत्तर फाईल करणार आहेत.
या दोघांविरुद्ध 124A सारखी गंभीर कलमे लावण्यात आली आहेत, अशा परिस्थितीत त्यांना जामीन मिळू नये, यासाठी सरकारी वकिलांचा सध्या प्रयत्न सुरू आहे. १४ दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दोन्ही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. खोटे जात प्रमाणपत्र दिल्याचेही आरोप नवनीत राणा यांच्यावर आहेत. दोघांनाही जामीन मिळाल्यास बाहेर पडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला. अखेर न्यायालयाच्या व्यग्र शेड्युलमुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे.