esakal | "काँग्रेसला हे अजिबात आवडलेलं नाही"; राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

बोलून बातमी शोधा

"काँग्रेसला हे अजिबात आवडलेलं नाही"; राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी
"काँग्रेसला हे अजिबात आवडलेलं नाही"; राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातील माहिती दिली. त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे आणि राज्य सरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस मोफत देण्याच्या निर्णयावर विचार सुरू असतानाच राष्ट्रवादीने घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली. महाविकास आघाडीतील नेत्याने यावर मत व्यक्त केलं.

"लसीकरणाबाबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी, नागरिकांना लस मोफत दिली गेली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मोफत लस द्यावी अशी मागणी आम्हीदेखील मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत. पण मुख्यमंत्री याबद्दल विचार करत असताना केवळ श्रेय घेण्यासाठी जर कोणी काही जाहीर करत असेल, तर ते आम्हाला आवडलेलं नाही", अशा स्पष्ट शब्दात बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. "नागरिकांना लस मोफत द्यावी या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे. त्यामुळे याबाबत चर्चा सुरू असताना श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही", असंही ते म्हणाले.

"45 वर्षांच्या वरील लोकांना लसीकरण देताना गोंधळ झाला होता, त्यामुळे आता 18 वर्षांवरील नागरिकांना लस देताना धोरण ठरवावं लागेल. आता गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यात गोंधळ होऊन कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. या साऱ्याचा विचार करताना मी मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली. आपण राज्याचं धोरण ठरवलं पाहिजे, असं त्यांना सांगितलं. लस उपलब्ध करून देणं ही केंद्राची जबाबदारी आहे आणि लसीकरण करणं राज्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे दोन दिवसांत या संबंधीचे धोरण निश्चित केले जाईल", अशी माहितीही त्यांनी दिली.