महामुंबईची ‘पूर’ती कोंडी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुंबईत शनिवार सकाळपासून रविवारी सकाळपर्यंत धुवाधार पाऊस झाला. या २४ तासांत मुंबईत अनेक ठिकाणी २०० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली.

मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ५९ जणांची हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून सुटका केली. पालघर जिल्ह्यातील वसई मिठागर परिसरात अडकलेल्या ४०० जणांची सुटका करण्याचे काम सुरू झाले आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.

मुंबईत शनिवार सकाळपासून रविवारी सकाळपर्यंत धुवाधार पाऊस झाला. या २४ तासांत मुंबईत अनेक ठिकाणी २०० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने मिठी नदीच्या परिसरातून दोन दिवसांत सुमारे तीन हजार ५०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. मुंबई परिसरात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे रविवारी सकाळीच मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे घराबाहेर निघालेल्या नागरिकांचे हाल झाले. रविवार असल्यामुळे बहुतेक नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने रस्ते मोकळे होते. दुपारीही पावसाची रिपरिप सुरू होती; नंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. 

रविवारी दुपारी भरती असल्यामुळे समुद्राचे पाणी नद्यांमध्ये शिरले. त्यामुळे सायंकाळपर्यंत मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. सायंकाळी ७.३० वाजल्याच्या सुमारास मुंबईहून ठाणे व कल्याणसाठी लोकल सेवा सुरू झाली. हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र रात्री उशिरापर्यंत बंद होती. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईचा मुंबईशी संपर्क खंडित झाल्यात जमा होता. मुंबई-नाशिक महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती होती. पालघरमधील नालासोपारा आणि वसई परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून, घरांतही पाणी शिरले आहे. वसईतील मिठागर परिसरात ४०० जण अडकले असल्याची शक्‍यता आहे. त्यापैकी काही जणांची एनडीआरएफने सुटका केली असून बचावकार्य सुरू आहे. 
ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. अंबरनाथपुढील भागाला उल्हास नदीच्या पुराचा मोठा फटका बसला. कल्याणमध्ये काळू नदी आणि उल्हास नदीच्या संगमावर पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शहराला पाण्याचा वेढा बसला होता. हवाई दलाने कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावातील पुरात अडकलेल्या ५९ जणांची हेलिकॉप्टरमधून सुटका करून ठाण्यातील कोलशेत तळावर सुखरूप आणले.

दोघांचा मृत्यू; दोघे वाहून गेले
मुंबईतील सांताक्रूझ येथे विजेचा धक्का लागून माला भूमन्ना नागम (५२) आणि संकेत भूमन्ना नागम (२६) या माय-लेकाचा मृत्यू झाला. धारावी येथे मोहम्मद शेख हा तरुण खाडीत वाहून गेल्याची शक्‍यता आहे. दिंडोशी येथे दरड कोसळून चार जण जखमी झाले. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्‍यात १६ वर्षांचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला.

विमान सेवेला फटका 
मुंबईतील मुसळधार पावसाचा रविवारी हवाई वाहतुकीलाही फटका बसला. कमी दृश्‍यमानता व खराब हवामानामुळे काही विमानांची उड्डाणे दोन तास विलंबाने झाली. एअर इंडियाच्या ९.३५ वाजता जोधपूरकडे जाणाऱ्या विमानाचे उड्डाण रखडले. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.

पावसाची खबरबात 

ठाणे 
- सलग दुसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळित
- ठिकठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे सेवा कोलमडली, रस्त्यांवर वाहतूक कोंडी, लांब पल्ल्याच्या - - - प्रवाशांची तासन्‌तास रखडपट्टी
- नद्यांवरील अनेक पूल पाण्याखाली
- जू गावातील सुमारे ५९ जणांची 
- पुरातून सुटका

नवी मुंबई
- शीव-पनवेल महामार्गावरील नेरूळचा परिसर जलमय
- ठाणे-बेलापूर मार्गावर महापेजवळ भुयारी मार्ग पाण्याखाली
- दिवसभर हार्बर मार्गावरील वाहतूक बंद
- नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांमध्ये शुकशुकाट होता.

पनवेल
-  तालुक्‍यातील घोट गावात हाजीमलंग नदीच्या पात्रातील पाणी घुसले 
- अनेक घरे पाण्याखाली, रस्ते बंद, नागरिकांचे पुरते हाल
- घरांत व शेतांत पुराचे पाणी शिरल्याने नुकसान
- पुरात अडकलेल्या २०० जणांची सुटका

रायगड
-  वडखळ नाक्‍यावर पाणी, मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली
- रस्ते खचल्याने, जलमय झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला 
-  अंबा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली, गावांना सतर्कतेचा इशारा 
-  वाकण-पाली-खोपोली महामार्गावर पुलांवरून पुन्हा पाणी
- पेण शहर जलमय, शेकडो गावे धोक्‍याच्या छायेत
-  अंतोरे गावात पाण्यात अडकलेल्या ६५ जणांची सुटका
-  रोह्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळित
- अलिबाग, रोहा, पेण, नागोठणे, महाड एसटी आगार जलमय, बस बंद
-  महाडला पुराचा तडाखा, घरांची पडझड, अनेक गावांचा संपर्क तुटला

पालघर
-  तीन दिवसांपासून पावसाने थैमान, गाव-पाड्यांसह शहरांतही पूरस्थिती
- रस्ते, घरे पाण्याखाली, नदीकाठचे अनेक पूल वाहून गेले
- वसईच्या पूर्वपट्टीतील ५० गावांचा संपर्क तुटला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in MUmbai