esakal | घाट भागात जोरदार पाऊस; 24 मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Local-Train-In-Rain

घाट भागात जोरदार पाऊस; 24 मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळा घाट भागात जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. कसारा घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ वाहून गेले आहे. त्यामुळे बुधवारी पडणाऱ्या पावसामुळे घाट विभागातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, 24 लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 22 मेल-एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. (Heavy Rainfall in Mumbai Suburban area 24 Mail Express Trains Cancelled 22 Trains Short Terminated)

बुधवार- गुरुवारच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. रस्ते महामार्गासोबत रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून टिटवाळा ते इगतपुरी स्थानकांदरम्याची रेल्वे वाहतूक बंद केली आहे. यामुळे नाशिककडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्या अडकल्या होत्या. अमरावती एक्सप्रेस इगतपुरीजवळ अडकलेली होती. मात्र, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता 22 रेल्वे गाड्या शॉर्टटर्मिनेट करण्यात आलेल्या आहे. तर, गुरुवारी, (ता.22) रोजी येणाऱ्या आणि जाणाऱ्या 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेली आहे.

मुंबईसह उपनगरांत 'रेड अलर्ट'

मुसळधार पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे रुळांवर पाणी साचण्याबरोबरच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यात रुळांखालील खडी वाहून गेली तर सिग्नलचीही मोठी हानी झाली. या रेल्वे मार्गावरील दरड उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक सुद्धा रेल्वेचे ओवरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम सुद्धा करण्यात येत आहे. याशिवाय घाट विभागातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि कर्मचारी घाट विभागात तैनात करण्यात आले आहे.

loading image