मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस 
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम पुणे शहरातही दिसला. बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पुढील पाच दिवस शहरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री साडेआठपर्यंत 6.3 मिमी पावसाची नोंद झाली होती. 

मुंबई : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या 24 तासांत मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि कोकणातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार; तर पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. सध्या मॉन्सून कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटकचा अंतर्गत भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात सक्रिय आहे. हा पाऊस 11 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

गेल्या 24 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार; तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात सर्वदूर पाऊस पडला आहे. मराठवाड्यात अनेक दिवसांनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यात किनवट, निलंगा 60, आष्टी 50, अहमदपूर, अंबड, घनसावंगी, लातूर 40, औरंगाबाद, धर्माबाद, कन्नड, लोहा, माहूर, परभणी 30, अर्धापूर, औसा, गेवराई, हदगाव, हिमायतनगर, परतूर, वैजापूर 20 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. 

पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस 
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम पुणे शहरातही दिसला. बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पुढील पाच दिवस शहरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री साडेआठपर्यंत 6.3 मिमी पावसाची नोंद झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall predict in Mumbai and Kokan area