सिडकोने स्वप्नपूर्ती पुन्हा जलमय करून दाखवली; संरक्षण भिंतीतून पाण्याची वाट ; सिडकोची रहिवाशांना थूकपट्टी

सुजित गायकवाड
Wednesday, 23 September 2020

रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसाने खारघर येथील सिडकोची स्वप्नपूर्ती सोसायटी पुन्हा एकदा जलमय केली.

नवी मुंबई : रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसाने खारघर येथील सिडकोची स्वप्नपूर्ती सोसायटी पुन्हा एकदा जलमय केली. सिडकोने सोसायटीच्या पाठीमागील संरक्षण भिंतीचे केलेले काम कुचकामी ठरल्याने सोसायटीत सर्वत्र पाणी शिरले. सोसायटीतील रस्ते, गटारे आणि उभी असलेली वाहने रात्रभर गुडघाभर एवढ्या पाण्यात होती. 

मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने सिडकोच्या बांधकामाची पोलखोल केली. पावसामुळे सोसायटीच्या पाठीमागील संरक्षण भिंतीखालून पाण्याचे झरे वाहू लागले. चौकशी केल्यावर असे लक्षात आले की, सोसायटीमागे सुरू असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या बांधकामासाठी नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह बदलून भिंतीकडे आणून सोडला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला वाट मिळत नसल्याने पाणी प्रचंड दबावामुळे सिडकोने बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या खालून सोसायटीच्या आत येत आहे. याबाबत रहिवाशांनी सिडकोकडे तक्रार केल्यावर सिडकोने आपली जबाबदारी पनवेल महापालिकेच्या माथी मारून पाणी काढण्यासाठी दोन पंप बसवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम केल्याचे भासवले. मात्र 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री पासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सिडकोच्या बेजबादार कामाचा पर्दाफाश केला. भिंतीच्या खालून पाणी येऊ नये म्हणून सिडकोतर्फे बसवण्यात आलेल्या गोण्यांचा पाण्याच्या वेगापुढे टिकाव धरून राहिल्या नाहीत.

कोर्टात रंगणार कंगना विरुद्ध राऊत सामना, संजय राऊतांना प्रतिवादी करण्यास परवानगी

प्रचंड दाबाने पाणी सोसायटीत सर्वत्र शिरले. एखाद्या नदीतील पाण्याप्रमाणे सोसायटीत शिरलेल्या पाण्याला वेग प्राप्त झाला होता. रात्रभर सोसायटीतील सर्वच इमारतींना पाण्याचा वेढा पडला. सोसायटीतील पार्किंगमध्ये उभी असणारी सर्व वाहनांची चाके पाण्यात बुडाली. सकाळ पर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाणी वर पर्यंत चढायचे थांबले. मात्र सोसायटीच्या आवारात घुसलेले पाणी न ओसरल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांना पाण्यातून वाट काढून जावे लागले. सिडकोने स्वप्नपूर्तीच्या रहिवाशांच्या तोंडाला पाने पुसल्याची बाब मध्यरात्रीच्या पावसाने उघड झाली अशी भावना रहिवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. 

सापांचे नवे संकट
सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत जेव्हा पासून पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा पासून सोसायटीत विषारी सापांचा वावर वाढला आहे. पाण्यासोबत साप देखील वाहत येत असून हे साप नंतर सोसायटीच्या आवारात फिरताना दिसतात. कित्येक वेळेला साप पायाखाली जाताना नागरिक आणि लहान मुले बचावलेली आहेत. 

 

हे तर पनवेल महापालिकेचे काम 
स्वप्नपूर्ती सोसायटीच्या संरक्षण भिंतीमधून घुसत असलेल्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सिडकोची नसून पनवेल महापालिकेची असल्याचे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र याबाबत पनवेल महापालिकेने याआधीच हात वर केले असून हा प्रश्न सिडकोनेच सोडवावा अशी भूमिका घेतली आहे. कर गोळा करणाऱ्या आणि सोसायटीचा ताबा असणाऱ्या दोन्ही सरकारी यंत्रणांनी जबाबदारीतुन हात झटकल्याने स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी हतबल झाले आहेत.
---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains flooded CIDCOs swapnpurti society in Kharghar once again

टॉपिकस