कोंडीचा प्रश्‍न प्रशासनाच्या हाती

वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालक.
वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालक.

उरण, ता. ८ : आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प असलेल्या उरण तालुक्‍यातील नागरिक वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले आहेत. त्याचे तीव्र पडसादही उमटत असून तालुक्‍यातील आमदार ते ग्रामपंचायत सदस्यापर्यंतच्या प्रत्येकानेच हा प्रश्‍न सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस, महसूल प्रशासनाने सतर्क राहणे आवश्‍यक आहे, असे मत व्यक्त केले आहे.

वाहतूक कोंडीमुळे उरणमध्ये प्रवास नकोसा होतो. कधी कधी ही कोंडी दोन-दोन तास असते. त्यामुळे तालुक्‍यात संतापाची लाट आहे. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर यांनी सांगितले की, अवजड वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे हा प्रश्‍न बिकट झाला आहे. हा उरणचा विकास नाही, तर भकास आहे. या प्रश्‍नावर जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये वारंवार आवाज उठवला आहे. जिल्हा परिषद आध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. 

पंचायत समिती सदस्या शुभांगी पाटील यांनी सांगितले की, उरणचा विकास करताना, जेएनपीटी आणि सिडको प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे उरणचा विकास होण्याऐवजी हा तालुका समस्याग्रस्त झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास होतो. वाहतूक विभाग आणि तहसील कार्यालयाने त्याची दखल देऊन मार्ग काढणे आवश्‍यक आहे.जासईचे सरपंच संतोष घरत यांनीही या प्रश्‍नावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उरणच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन आता तोडगा काढावा. 
उरणमधील रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांची कामे योग्य दर्जाची झाली पाहिजेत. प्रशासनाने हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सतर्क राहावे, असे मत डोंगरीतील रहिवासी रोहन घरत यांनी व्यक्त केले. 

वाहतूक कोंडीमुळे उरणमधील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक, वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त, कंत्राटदार,  तहसीलदार यांची बैठक घेतली होती. जासई ते गव्हाण फाटा मार्गावरील गोदामांवर काही बंधने आणली होती. वन विभागाने महामार्ग चारकडे जाण्यासाठी बंद केलेला रस्तासुद्धा खुला करण्याची सूचना केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी ५० टक्के कमी झाली आहे. रस्त्यावर ट्रेलर उभे असतात. त्यामुळे हा प्रश्‍न बिकट होतो. त्यासाठी कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डेही तातडीने बुजवायला सांगितले आहेत.
- मनोहर भोईर, आमदार, उरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com