मुंबईतील पूरग्रस्तांना दहा हजारांचे मदत करा, भाजपची मोर्चाद्वारे मागणी

मुंबईतील पूरग्रस्तांना दहा हजारांचे मदत करा, भाजपची मोर्चाद्वारे मागणी

मुंबई: मुंबईतील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आणि महापालिकेने वाऱ्यावर सोडले असून महापालिकेकडील ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडून त्यातून पूरग्रस्तांना घरटी किमान दहा हजार रुपये मदत करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मोर्चाद्वारे केली आहे. 

या पावसाळ्यात मुंबईत दोन-तीन वेळा अतिवृष्टी झाल्यानं सखल भागात तीन फुटांपर्यंत पाणी साठले. यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आणि त्यांची मोठी वित्तहानी झाली. वारंवार मागणी करूनही या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आज कांदिवली येथील तलाठी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी भाजपद्वारे पूरग्रस्तांना घरटी किमान दहा हजार रुपये मदत करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

सध्या एकतर कोरोनामुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे, त्यातच या अतिवृष्टीमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी त्यांची अवस्था झाली आहे. महापालिकेच्या आणि सरकारी यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना वारंवार पूरस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या मुंबईकर नागरिकांना देखील सरकारने एक रुपयाचीही मदत दिली नाही.  त्यामुळे निदान आतातरी अतिवृष्टीच्या नुकसानीचे तत्काळ नजर पंचनामे करावे आणि घरटी दहा हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी. तसेच रिक्षाचालक, झोपडीवासीय, घरकाम करणाऱ्या महिला, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांना देखील दहा हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी भातखळकर यांनी यावेळी केली. 

कोरोना आणि अतिवृष्टीमुळे लोकांचे एवढे हाल झालेले असतानाही उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे एकदाही उपनगरात फिरकले नाहीत. तसेच त्यांनी मागील आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक सुद्धा घेतली नाही. मुंबईकरांचे हाल होत असताना ठाकरे सरकार मात्र मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून ताज पंचतारांकित हॉटेलबरोबर पर्यटनाचे करार करण्यात मग्न आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली.

परिसरातच पुनर्वसन करा

 
पोईसर नदी रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या हनुमान नगर आणि पोईसर येथील कुटुंबाना मालाड (पूर्व) येथील अप्पापाडा परिसरात घरे देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. मात्र आता तो निर्णय बदलून ती घरे माहुल येथील लोकांना देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ही घरे पोईसर नदीच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या कुटुंबांना तसेच उत्तर मुंबई परिसरातील बाधितांना प्राधान्यक्रमाने मिळणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता या सर्व लोकांना चेंबूर येथे जाण्यास सांगितले जात आहे आणि चेंबूरच्या जवळ असलेल्या माहुल येथील लोकांना मालाड येथे आणण्यात येत आहे. हा अव्यवहारिक निर्णय न बदलल्यास त्याविरोधात पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशाराही भातखळकर यांनी दिला. या मोर्चात नगरसेवक शिवकुमार झा, सुनिता यादव, सुरेखा पाटील, उत्तर मुंबई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह  शेकडो रहिवासी उपस्थित होते.

-----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Help tens thousands flood victims Mumbai Demand by BJP

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com